Assam showroom fire:आसामची राजधानी गुवाहाटी येथे एका शोरूमला भीषण आग लागल्याने कोट्यवधी रुपयांच्या गाड्या खाक झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, या शोरूममध्ये इसुझू चारचाकी आणि बेनेली बाइक्सची विक्री होते. हे शोरूम शहरातील बशिष्ठ परिसरात होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने आगीत जीवितहानी झालेली नाही. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या कार आणि दुचाकी जळून खाक झाल्या. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आले आहेत.
शोरूममध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आगीत किमान ₹1.5 कोटी किमतीच्या इसुझू कारचे नुकसान झाले आहे आणि किमान ₹6 लाख किमतीच्या बेनेली मोटारसायकलीही पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार एकूण 4-5 कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जपानी ऑटोमेकर Isuzu भारतात MU-X SUV आणि D-Max लाईफस्टाईल पिकअप ट्रक विकते. डी-मॅक्स पिकअपची किंमत ₹19.50 लाख आहे तर MU-X SUV ची किंमत सुमारे ₹35 लाख (एक्स-शोरूम) आहे. बेनेली भारतात सहा मॉडेल्स विकते. कंपनीची सर्वात स्वस्त बाईक Imperiale 400 आहे ज्याची किंमत सुमारे ₹ 2.25 लाख (एक्स-शोरूम) आहे.