प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात जाणार्या अंजूच्या कुटुंबीयांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. अंजूच्या वडिलांना आणि कुटुंबीयांना आता गावाबाहेर काढण्याचा विचार केला जात आहे. अंजूमुळे गावाची बदनामी होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, त्यामुळे ते गया प्रसाद थॉमस यांना स्वत:साठी नवीन जागा शोधण्यास सांगत आहेत.
आपल्या मुलाला आणि पतीला भारतात सोडून अंजू पाकिस्तानमध्ये तिचा प्रियकर नसरुल्लाहला भेटायला गेली होती. पाकिस्तानमधील अंजूचे फोटो सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. अंजूने नसरुल्लाहशी पाकिस्तानात निकाह केल्याचं म्हटलं जात आहे. तिने तिचं नाव आता फातिमा केलं आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
अंजू तिच्या वडिलांना भेटायला आली तर काय करणार असा प्रश्न ग्रामस्थांना विचारण्यात आला. त्यावर असे उत्तर आले की, असा प्रकार घडला तर वडील व कुटुंबालाही गावाबाहेर हाकलून देऊ. गावकऱ्यांनी सांगितले की, भारत सरकार या प्रकरणाकडे लक्ष देत आहे. पण आम्ही तिला इथे येऊ देणार नाही.
अंजूचे वडील गया प्रसाद यांनी आमचा तपास करा, आम्हाला काही अडचण नाही. आमच्याकडे कोणत्याही संशयास्पद वस्तू नाहीत. मी एक साधा माणूस आहे मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहे. माझ्या मनातील वेदना कोणीही समजू शकत नाही असं म्हटलं आहे. अंजूमुळे माझे संपूर्ण कुटुंब अडचणीत आहे. माझ्या मुलाची नोकरी गेली. माझं कुटुंब विखुरलं. आता आम्ही फक्त देवाला विनंती करतो की आम्हाला त्याने न्यावं. असं गुदमरून पण जगू शकत नाही असंही म्हटलं.