अग्नितांडव! आयसीयूतील AC चा स्फोट झाल्याने भीषण आग; खिडक्या तोडून रुग्णांना काढलं बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 10:20 IST2025-03-16T10:20:23+5:302025-03-16T10:20:51+5:30
एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे स्फोट झाला. यानंतर काही वेळातच आग पसरली.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील जयआरोग्य हॉस्पिटल ग्रुपच्या कमलाराजा हॉस्पिटलमध्ये रात्री अचानक भीषण आग लागली. लेबर रूमच्या गायनोकॉलजी आयसीयूमध्ये ही आग लागली, एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे स्फोट झाला. यानंतर काही वेळातच आग पसरली. या काळात आयसीयू आणि आसपासच्या वॉर्डमध्ये एकूण २२ रुग्ण दाखल होते, तर सुमारे १०० रुग्ण लेबर रूममध्ये आणि ५० रुग्ण पीडियाट्रिक्स वॉर्डमध्ये उपस्थित होते.
आगीनंतर रुग्णालय धुराने भरलं होतं, त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण होतं. रुग्णालय प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. वॉर्ड बॉयनी रुग्णांना ताबडतोब सुरक्षित सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवलं. परिस्थिती बिकट झाल्यावर वॉर्डच्या खिडक्यांच्या ग्रिल तोडून व्हेंटिलेशनची व्यवस्था करण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचलं आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रुचिका चौहान, एसडीएम विनोद सिंह, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सक्सेना आणि इतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. लेबर युनिट आणि लगतच्या वॉर्डमध्ये दाखल असलेल्या सर्व रुग्णांना रुग्णवाहिकांच्या मदतीने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या पथकाने तातडीने काम केलं आणि रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवलं.
प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर आलं आहे. रुग्णालय प्रशासन आता सुरक्षा व्यवस्था कुठे कमी पडली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती पावलं उचलली पाहिजेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या रुग्णालयातील परिस्थिती सामान्य आहे, परंतु या घटनेमुळे रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.