ग्वाल्हेर: सात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली पत्नी आणि मुलं अखेर पतीला सापडली. मात्र तिला पाहून पतीला धक्का बसला. पोलिसांनी पत्नीला शोधून काढलं. मात्र पत्नीनं तिच्या प्रियकरासोबत विवाह करून संसार थाटला होता. पत्नीचा प्रियकर ४ मुलांचा बाप आहे. सात वर्षांनंतर सापडलेल्या पत्नीनं प्रियकरासोबतच राहायचं असल्याचा हट्ट धरला. त्यामुळे पतीला जबर धक्का बसला.
ग्वाल्हेरच्या हजिरामध्ये वास्तव्यास असलेल्या जितेंद्र सिंह कुशवाहचा विवाह १५ वर्षांपूर्वी सबलगढच्या सुधा जादौनसोबत झाला. लग्नानंतर सुधानं जितेंद्रकडे सबलगढमध्येच राहण्याचा आग्रह धरला. त्यामुळे दोघे सबलगढमध्ये सुनील जादौनच्या घरात भाड्यानं राहू लागले. लग्नानंतर दोनच वर्षात सुधाला एक मुलगा, एक मुलगी झाली. काही वर्षांनंतर जितेंद्र सुधासोबत ग्वाल्हेरच्या हजिरामध्ये राहू लागला. यादरम्यान जितेंद्रला राजस्थानातल्या जयपूरमध्ये कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली. पत्नी सुधा आणि दोन मुलांना ग्वाल्हेरमध्ये ठेवून जितेंद्र नोकरीसाठी जयपूरला गेला. दुबईत नोकरी लागली, कौतुकही झालं; आई- भावासोबत जेवली अन् मग वेगळाच निर्णय घेतला!
मार्च २०१४ पासून सुधा ७ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांच्या मुलासह बेपत्ता झाली. घरमालकानं जितेंद्रला याची माहिती दिली. सुधाला शोधण्यासाठी जितेंद्र जयपूरहून ग्वाल्हेरला आला. त्यानं ग्वाल्हेरपासून सबलगढपर्यंत सुधाचा शोध घेतला. मात्र ठावठिकाणा समजला नाही.
ग्वाल्हेरमध्ये पोलिसांनी बेपत्ता महिलांच्या शोधासाठी ऑपरेशन मुस्कानची सुरुवात केली. ग्वाल्हेर पोलिसांनी सुधाचा शोध सुरू केला. सुधाच्या कुटुंबीयांनी घरमालक सुनील जादौनवर संशय व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले. सुनीलचं लोकेशन महिन्यातून १० ते १५ दिवस उत्तर प्रदेशातल्या वृंदावनमध्ये असल्याचं आढळलं. त्यामुळे पोलिसांनी वृंदावनमध्ये शोधाशोध सुरू केली. तेव्हा सुधा सापडली. मात्र तिनं पतीसोबत राहण्यास नकार दिला.