लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीत ज्याठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे, तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्याबरोबरच नमाज पढण्याच्या मुस्लिमांच्या अधिकारावर गदा न आणण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिले. पुढील सुनावणी गुरुवारी, १९ मे रोजी होईल.
या मशीद परिसरातील चित्रीकरणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने वरील निर्देश दिले. संबंधित ठिकाणाच्या सुरक्षेची जबाबदारी वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
मिश्रा यांची हकालपट्टी
मशीद परिसराचे चित्रीकरण करण्याची जबाबदारी असलेल्या चमूचे प्रमुख ॲडव्होकेट कमिशनर अजयकुमार मिश्रा यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. चित्रीकरणाची प्रत न्यायालयाकडे सुपूर्द करण्याआधीच चित्रीकरणाचे काही अंश प्रसारमाध्यमांकडे दिल्याचे निदर्शनास आल्याने मिश्रा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.