Gyanvapi Mosque Asaduddin Owaisi: ज्ञानवापी मशीदीच्या मुद्द्यावरून सध्या देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याच मुद्द्याबाबत बोलताना AIMIM चे नेता असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं विधान केलं. "मी या मुद्द्यावर बोलतच राहणार. कारण मी फक्त अल्लाला घाबरतो, बाकी कोणाचीही मला भीती नाही. योगी किंवा मोदीला मी घाबरत नाही", असं ते म्हणाले. गुजरातमधील छापी या ठिकाणी ते एका सभेत बोलत होते.
"मी जेव्हा ज्ञानवापी मुद्द्यावर बोलण्यास सुरूवात केली, त्याच वेळी काही मुस्लीम संघटनांनी माझ्यावर टीका करायला सुरूवात केली. त्या संघटनांनी मलाच विचारलं की तुम्ही या मुद्द्यावर कशाला बोलता? मला असे प्रश्न विचारणाऱ्यांना मी विचारू इच्छितो की मी जर बोललो नाही तर तुम्ही या मुद्द्यावर तोंड उघडणार आहात का? जे लोक मला 'बोलू नका' असं सांगत आहेत, त्यांनी स्वत:तरी या मुद्द्यावर बोलावं. मी या साऱ्यांना सांगतो की, मी बोलतच राहणार. कारण मला अल्लाची सोडून इतर कोणाचीही भीती वाटत नाही. मी योगी किंवा मोदी यांना घाबरत नाही", असे विधान ओवेसींनी गुजरातमध्ये केले.
"मी बोलतो कारण मी जिवंत आहे. माझ्यात अजूनही जीव शिल्लक आहे. मी बोलतो कारण मी अजूनही माझ्या धर्माशी इमान राखलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मी बोलत आणि बोलतच राहणार कारण मी फक्त अल्लाह ला घाबरतो. कोणत्याही योगी किंवा मोदीला मी घाबरत नाही. मला बोलण्याचा अधिकार आहे. जर तुम्हाला मी बोललेल्या गोष्टी आवडत नसतील तर तुम्ही स्वत:च्या कानात बोटं घाला, पण मी मात्र बोलायचा थांबणार नाही", असे ओवेसी म्हणाले.
मुस्लीम संघटनांवरही केले सवाल
हिजाबचा जेव्हा मुद्दा चर्चेत होता, त्यावेळी मुस्लीम संघटना बोलल्या नाही. मांसाहाराचा मुद्दा उपस्थित झाला त्यावेळीही तुम्ही कोणीही बोलला नाहीत. मुस्लीम युवकांना नोकऱ्या दिल्या जात होत्या, त्यावेळी त्याला जॉब जिहाद असं नाव दिलं गेलं, पण तेव्हाही मुस्लीम संघटनांनी तोंड उघडलं नाही. मग आता मशिदीच्या विषयावर आम्ही न्यायपालिकेत जाऊन रितसर आमची बाजू मांडत आहोत, तर आम्हाला 'तुम्ही का बोलता?' असा सवाल का केला जातोय", अशा शब्दांत त्यांनी मुस्लीम संघटनांवरही नाराजी व्यक्त केली.