नवी दिल्ली: वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसरात सापडलेल्या शिवलिंगाच्या पुजेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने लवकरच सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालय 21 जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी करणार आहे, ज्यामध्ये शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगचीही मागणी करण्यात आली आहे. कार्बन डेटिंगमुळे शिवलिंग किती प्राचीन आहे हे कळेल, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला ज्ञानवापी कॉम्प्लेक्सच्या जीपीएस ट्रॅकिंग म्हणजेच ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार सिस्टीमद्वारे भूगर्भातील परिस्थिती शोधण्याचे आदेश देण्यास सांगण्यात आले आहे.
हिंदू पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत पवित्र श्रावण महिना सुरू असून, ज्ञानवापी मशिदीमध्ये असलेल्या शिवलिंगाची पूजा करणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, हिंदूंना भारतीय राज्यघटनेच्या कलम 25, "विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि मुक्त व्यवसाय, धर्माचे पालन आणि प्रसार" अंतर्गत त्यांचा अधिकार वापरण्याची परवानगी दिली जाऊ शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हिंदूंना तेथे पूजा करण्याची परवानगी द्यावी. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
याचिकेत आणखी काय म्हटले आहे?कृष्णजन्मभूमी मुक्ती दलाचे अध्यक्ष राजेश मणि त्रिपाठी यांच्या वतीने ज्ञानवापी मशीद परिसरात सर्वेक्षणादरम्यान ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले त्या ठिकाणी धार्मिक विधी करण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. "वाराणसी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या 'शिवलिंगा'वर भारतीय राज्यघटनेनुसार अर्जदाराला त्याच्या धार्मिक प्रथा करण्याची इच्छा आहे," असे याचिकेत म्हटले आहे.