वाराणसी :उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या अंतर्भागातील व्हिडीओ सर्वेक्षणाचे काम शनिवारी हाती घेण्यात आले. त्यातील अपुरे राहिलेले काम उद्या, रविवारीही सुरू राहणार आहे. या सर्वेक्षणामुळे सुमारे दीड हजार पोलीस ज्ञानवापी मशीद परिसरात तैनात करण्यात आले असून, सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत हे चित्र कायम राहणार आहे.
कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये याची पोलिसांकडून नीट काळजी घेतली जात आहे. पण या गोष्टीचा काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षासह सर्वच विरोधी पक्षांनी मौन बाळगले आहे. मुस्लीम समाजविरोधी पक्षांची व्होटबँक नसल्याने हे पक्ष ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीत, असा आरोप एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी केला.
ज्ञानवापी मशिदीमध्ये सुरू असलेल्या व्हिडीओ सर्वेक्षणाविरोधात अंजुमन इंतेजामिया मशीद या संघटनेने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय लवकरच सुनावणी घेणार आहे. आदेशाची प्रत सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर झळकविण्यात आली आहे. खंडपीठ ही याचिका कधी सुनावणीसाठी घेणार त्याची तारीख या आदेशात दिलेली नाही.