बंगळूरू : कर्नाटकमध्ये बहुमत मिळूनही भाजपला सत्तेबाहेर ठेवत काँग्रेसने जेडीएसशी आघाडी केली आणि कुमारस्वामींना बिनशर्त मुख्यमंत्री बनविले. मात्र, कुमारस्वामींना गेल्या सहा महिन्यांपासून त्रास देण्याचा सपाटा काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुच ठेवला असून जेडीएसचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी काँग्रेसला आता थेट इशाराच देऊन टाकला आहे.
गेल्या सहा महिन्यांत खूप काही घडले आहे, आता पर्यंत शांत राहिलो परंतू यापुढे शांत राहणार नाही, अशी धमकीच त्यांनी दिल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मित्रपक्ष गमवावा लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या नेत्यांकडून कुमारस्वामी सरकारला होत असलेल्या त्रासावर कुमारस्वामी याआधीही बोलले आहेत. आता एच. डी. देवेगौडा यांनी दखल घेत काँग्रेसवर थेट आरोप केले आहेत.
सरकार चालविण्याचा हा कोणता प्रकार आहे? सहकारी पक्षाच्या नेत्यांची दर दिवशी मनधरनी करावी लागतेय की असंसदीय वक्तव्य करू नका. कुमारस्वामींना मुख्यमंत्री बनून सहा महिने झाले. आता पर्यंत शांत राहिलो परंतू यापुढे शांत राहणार नाही, असा इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे.
विधानसभा निवडणुकीपासूनच कर्नाटकमध्ये राजकीय नाट्य रंगत आहे. काँग्रेसला बहुमत न मिळाल्याने सत्ता सोडावी लागल्याचे शल्य आहे, तर कुमारस्वामींच्या जागा कमी असूनही त्यांना मुख्यमंत्री पद द्यावे लागल्याने काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु आहे. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारावेळी डावलले गेल्याचा रागही काँग्रेसच्या काही माजी मंत्र्यांमध्ये आहे. यामुळे हे नेते जाणूनबुजून कुमारस्वामी सरकारविरोधात वक्तव्ये करत आहेत. बुधवारीच कुमारस्वामींनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याची धमकी दिली होती.