नवी दिल्ली : निवडणूक आयोगातील पाच वर्षांची कारकिर्द संपवून मुख्य निवडणूक आयुक्त वीरवल्ली सुदर संपत गुरुवारी सेवानिवृत्त होत असून, त्यांच्यानंतर निवडणूक आयुक्त हरीशंकर बह्मा यांची त्या पदावर नेमणूक होईल, असे संकेत सरकारी सूत्रांनी दिले.त्रिसदस्यीय निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त संपत यांच्याखेरीज ब्रह्मा व डॉ. नसीम झैदी असे दोन निवडणूक आयुक्त आहेत. ब्रह्मा आॅगस्ट २०१० मध्ये तर डॉ. झैदी आॅगस्ट २०१२ मध्ये निवडणूक आयुक्त झाले. बहुसदस्यीय निवडणूक आयोगात ज्येष्ठ निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्तपदी नेमण्याची रूढ प्रथा आहे. ही प्रथा मोडण्याचे कोणतेही सबळ कारण नसल्याने ज्येष्ठतेनुसार संपत यांचे उत्तराधिकारी म्हणून ब्रह्मा यांची नेमणूक होईल, असे कळते.सूत्रांनुसार सरकारकडून तशी शिफारस औपचारिकपणे केली गेल्यानंतर राष्ट्रपती या नेमणुकीचा आदेश केव्हाही काढतील. मूळचे आसामचे असलेले ब्रह्मा १९७५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. निवडणूक आयोगावर नेमणूक होण्याआधी ते केंद्रीय ऊर्जा खात्याचे सचिव होते. मुख्य निवडणूक आयुक्त या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नेमणूक होणारे ब्रह्मा हे जे. एम. लिंगडोह यांच्यानंतरचे ईशान्य राज्यातील दुसरे अधिकारी असतील. दरम्यान, संपत यांची मार्च २००९ पासूनची आधी निवडणूक आयुक्त व नंतर मुख्य निवडणूक आयुक्त पदाची कारकिर्द भारतीय लोकशाही अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने संस्मरणीय म्हणावी लागेल.
एच. एस. ब्रह्मा मुख्य निवडणूक आयुक्त
By admin | Published: January 15, 2015 5:44 AM