ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - आपण अनेकदा घाईघाईत एखाद्या ठिकाणी पोहोचतो आणि नेमकं कशासाठी आलो आहोत, हेच लक्षात येत नाही. असं अनेक जणांसोबत होत असतं. अशावेळी अनेकांना स्वत:चा प्रचंड राग येत असतो, ज्यामुळे तणावही वाढत असतो. पण असं का होतं याचा कधी तुम्ही विचार केला आहे का ? विरसण्याची ही सवय अनेकांमध्ये सामान्य झाली असून एका ठरविक वेळेनंतर ही सवय एका गंभीर आजाराचं रुप घेते.
सेफ्टी अँण्ड सेक्युरिटी फॉर जनरेशन्सने (SAGA) केलेल्या एका सर्व्हेक्षणात विसरभोळेपणाचा हा आजार ह्रदयविकार आणि कॅन्सरपेक्षाही जलद गतीने फैलावत आहे. 2010 ते 2013 दरम्यान अशा लोकांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर बेरी गॉर्डन यांनी सांगितलं आहे की, 'हा आजार गतीने फैलावत आहे. कामाच्या ठिकाणी असणारा ताण आणि यश मिळवण्यासाठी सुरु असलेली शर्यत हे एक कारण असू शकतं'.
मध्यम वयोगटातील व्यक्तींमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ज्या लोकांवर प्रमाणापेक्षा जास्त कामाचा बोझा असतो त्यांच्यामधे तसंच स्वत:साठी अजबिात वेळ न देणा-यांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसत असल्याचं समोर आलं आहे.
'जेव्हा दुसरे लोक तुमच्याकडून प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवतात तेव्हा तुम्ही स्वत:ला विसरु लागता. हा आजार जाणवत असल्यास त्यामधून सुटका करुन घेण्यासाठी सर्वात आधी स्वताकडून प्रमाणपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणं बंद केलं पाहिजे', असं डॉक्टर बेरी यांनी सांगितलं आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट विसरतो तेव्हा स्वत:ला दोषी ठरवू लागतो. पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात असते तेव्हा मात्र आपण स्वत:ला क्रेडिट देत नाही.
प्रमाणापेक्षा जास्त माहिती गोळा करताना प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं नाही. त्यामुळे स्वत:ला जागरुक ठेवा मात्र त्याचं ओझं होऊ देऊ नका. कोणीही पुर्पणणे परफेक्ट नसतो हेदेखील लक्षात ठेवा. काही विसरत आहोत असं सारखं वाटत असेल तर आपल्या राहणीमानात थोडा बदल करु पहा.