'सोनिया गांधींनी पाठिंबा दिला नसता, तर तेलंगणाची निर्मिती झाली नसती'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 05:29 AM2023-10-21T05:29:23+5:302023-10-21T05:29:43+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य
हैदराबाद : काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाली नसती, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी काँग्रेसने विजयाभेरी यात्रेचे आयोजन केले आहे. त्यात सहभागी झालेले राहुल गांधी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत.
त्यांनी एका सभेत सांगितले की, तेलंगणासह, राजस्थान, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेस भाजपचा पराभव करणार आहे. काँग्रेसकडून तेलंगणात भारत राष्ट्र समिती पराभूत होईल. भारत राष्ट्र समितीच्या सरकारने या राज्याचा विकास केलेला नाही. तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जितक्या पैशांची लूट केली, तो सारा पैसा आम्ही जनतेला परत देणार आहोत. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस पक्ष संसदेत भाजपला पाठिंबा देतो. या गोष्टी जनतेने नीट समजून घ्याव्यात, असे राहुल गांधी यांनी जगतियाल येथील प्रचारसभेत सांगितले. (वृत्तसंस्था)
ही सरंजामदार विरुद्ध जनता अशी लढाई
राहुल गांधी म्हणाले, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे तेलंगणाशी (त्यावेळी हा प्रदेश आंध्र प्रदेश राज्याचा भाग होता) जिव्हाळ्याचे संबंध होेते. तेलंगणातील विधानसभा निवडणूक म्हणजे सरंजामदार विरुद्ध सामान्य जनता अशी लढाई आहे.
राहुल गांधी यांनी बनविला डोसा
विजयाभेरी यात्रेदरम्यान राहुल गांधी जगतियालनजीक एका खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर थांबले. तिथे त्यांनी स्वत: डोसा बनविला आणि साेबतच्या लाेकांना खाऊ घातला. त्यांनी परिसरातील मुलांना चॉकलेटही वाटली, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
हळद उत्पादकांना प्रति क्विंटल १२-१५ हजार रुपये
तेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १२ ते १५ हजार रुपये आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विजयाभेरी यात्रेचे आयोजन केले आहे.