नवी दिल्ली: मोदी सरकारनं लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही शेतीशी संबंधित विधेयकं मंजूर करून घेतली. मात्र विधेयकांवर चर्चा सुरू असताना राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपसभापतींच्या समोरील नियम पुस्तिकेची तोडफोड केली. माईकहीदेखील तोडण्यात आले. यावरून आता भाजपनं विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारमधील तीन मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभेत झालेल्या गोंधळावरून विरोधकांवर टीका केली.केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रल्हाद जोशी आणि पीयूष गोयल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचा अनादर झाला. ही घटना अतिशय दु:खद आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांचा विधेयकांना विरोध होता. त्यांनी त्यांच्या जागेवर बसून विधेयकाच्या विरोधात मतदान करायला हवं होतं. उपसभापतींनी १३ वेळा खासदारांना त्यांच्या जागेवर जाण्यास सांगितलं. मात्र तरीही खासदार ऐकले नाहीत. संसदेसाठी कालचा दिवस अतिशय लज्जास्पद होता. माईक तोडण्यात आले. नियम पुस्तिका फाडण्यात आली. त्यावेळी तिथे मार्शल नसते, तर उपसभापतींवर हल्लादेखील झाला असता,' असं प्रसाद म्हणाले.
'राज्यसभेत शेतीशी संबंधित २ विधेयकांवर चर्चा सुरू होती. त्यावेळी सदनात जो प्रकार घडला, तो अतिशय दु:खद आणि दुर्दैवी होता. यापेक्षा पुढे जाऊन बोलायचं झाल्यास झालेली घटना लज्जास्पद होती, असं मी म्हणेन. राज्यसभेच्या उपसभापतींना काय वागणूक देण्यात आली, ती सर्वांनी पाहिली,' असं राजनाथ म्हणाले. 'विरोधी पक्षाच्या खासदारांच्या वर्तनामुळे लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. जेव्हा जेव्हा संसदेत मर्यादा ओलांडली जाते, तेव्हा तेव्हा लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो. सभागृहात चर्चा घडवून आणणं सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. पण संसदेची प्रतिष्ठा राखणं विरोधकांचंही कर्तव्य आहे,' असं सिंह यांनी म्हटलं.