Manish Sisodia : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.त्यानंतर रविवारी (२२ सप्टेंबर) जंतरमंतर मैदानावर 'जनता अदालत' कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात बोलताना मनीष सिसोदिया यांनी ईडीच्या कारवाईनंतरचा एक अनुभव सांगितला. अरविंद केजरीवाल आणि माझ्यात फूट पाडण्याचा प्रयत्नही भाजपाने केला, असा दावा त्यांनी यावेळी केला.
कार्यक्रमात बोलताना सिसोदिया म्हणाले, "मला, केजरीवाल, संजय सिंह यांना तुरुंगात टाकण्याचे कारण भ्रष्टाचार नव्हते. कारण होते त्रास देण्याचे, दिल्लीतील कामे रोखण्याचे. १७ तुरुंगात ठेवण्याचे कारण आम्हाला आतून बाहेर तोडायचे. आमच्या टीमला तोडायचे होते."
तुरुंगात असतानाच्या गोष्टीही सिसोदिया यांनी सांगितल्या. यावेळी त्यांनी भाजपावर आरोप केले. "यांचे (भाजप) कितीतरी मेसेज यायचे. अनेक लोक मला म्हणाले की, कशाला अडकता, येऊन जा. हे लोक तुरुंगात सडवून मारून टाकतील. तुम्हाला हे लोक माहिती नाही. सोडून द्या, येऊन जा. मला सांगायचे की, राजकारणात असेच होते. कुणी कुणाचा विचार करत नाही. तुम्हाला बाहेर यायचे असेल, तर तुम्हाला त्यांचे ऐकावे लागेल", असे सिसोदिया म्हणाले.
बँक खात्यातील दहा लाखही जप्त केले -सिसोदिया
"मला म्हणायचे तुमचा मुलगा शिकतोय. आता कॉलेजमध्ये आहे. तुमच्या कुटुंबाचा विचार करा. २००२ मध्ये जेव्हा पत्रकार होतो, पाच लाखांत घर खरेदी केले होते. ते घरही यांनी हिसकावून घेतले. स्वतःच्या ताब्यात घेतले. माझ्या खात्यात पगाराचे दहा लाख रुपये होते. तेही जप्त केले", असे सिसोदिया भाजपावर टीका करताना म्हणाले.
"केजरीवालांनी अडकवल्याचे मेसेज द्यायचे"
"आधी घाबरवायचे. धमकवायचे. माझ्या खात्यातील दहा लाख जप्त केले. माझा मुलगा कॉलेजमध्ये शिकतो. त्याची फीस भरण्यासाठी मला लोकांसमोर हात पसरवावे लागले. मला मुलाची फीस भरायची आहे म्हणून. अशा पद्धतीने छळ करत होते. मानसिक छळ करत होते. कारण त्यांचा प्रयत्न होता की, मी खच्चून जावे. पण आम्ही केजरीवालांच्या टीममध्ये राहिलो. जेव्हा अजिबात खचलो नाही, तेव्हा म्हणाले, मनीषजी तुम्हाला माहिती नाही की, तुम्हाला अरविंद केजरीवालांनी अडकवले आहे, असा मेसेज द्यायचे", असे मनीष सिसोदिया म्हणाले.