हादियाची इच्छा पूर्ण; डॉक्टरकी शिकणार, वडिलांना आनंद, धर्मांतर व लग्न स्वेच्छेने केल्याची जबानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:14 AM2017-11-29T01:14:57+5:302017-11-29T01:18:12+5:30
केरळमधील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील हादिया या २४ वर्षाच्या विवाहितेस तिच्या इच्छेनुसार तमिळनाडूत सेलम येथे होमिओपथीचे शिक्षण घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून, त्याबद्दल हादियाच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : केरळमधील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील हादिया या २४ वर्षाच्या विवाहितेस तिच्या इच्छेनुसार तमिळनाडूत सेलम येथे होमिओपथीचे शिक्षण घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून, त्याबद्दल हादियाच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे.
सेलमच्या कॉलेजने हादियाला प्रवेश देऊन तिची तेथे होस्टेलवर राहण्याची व्यवस्था करावी आणि केरळ सरकारने तिला तेथे सुरक्षितपणे नेऊन पोहोचवावे, असा आदेश सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला. शिकत असताना हादियाच्या पालकत्वाची जबाबदारी कॉलेजच्या अधिष्ठात्यांवर सोपविली आहे. हिंदू अखिलाने शफीन जहाँ या मुस्लीम तरुणाशी धर्मांतर करून प्रेमविवाह केला. मात्र तिला फितवून मुसलमान केले गेले व तिच्याशी विवाह केला गेला, अशी तक्रार करत तिच्या वडिलांनी याचिका केल्यावर केरळ उच्च न्यायालयाने हा विवाह रद्दबातल केला होता. त्याविरुद्ध तिच्या पतीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले.
माझा खर्च पतीच करेल
हादियाला सोमवारी बंदोबस्तात न्यायालयापुढे आणले गेले. मी शफीन जहाँशी स्वेच्छेने लग्न केले आहे. माझे धर्मांतर कोणी बळजबरीने केलेले नाही व यापुढेही मला मुस्लीमच राहायचे आहे, असे हादियाने न्यायालयास सांगितले. मला शिकायचे आहे. त्यासाठी सरकारने खर्च करण्याची गरज नाही. माझा पती तो खर्च करण्यास समर्थ आहे, असेही तिने सांगितले.