ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद. दि. 28 - लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे. यासाठी त्याने दहशतवादी संघटना इसीसची मदतदेखील मागितली असल्याचं वृत्त आहे. इसीसला आपल्या दहशतवादी नेटवर्कमध्ये सामील करुन घेण्यासाठी हाफिज सईदची संघटना सिरियामध्ये सक्रिय आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिज सईदची संघटना फलाह-ए-इन्सानियत तेथील लोकांना मदत पुरवण्याचं काम करत आहे. पण मदतीच्या नावाखाली हाफिज सईद सिरियीमधील इसीसच्या दहशतवाद्यांशी संपर्क साधत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
फलाह-ए-इन्सानियतच्या नावाखाली हाफिज सईद लष्कर-ए-तयब्बाचं दहशतवादी नेटवर्क चालवतो. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिज इसीसच्या मदतीने भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे. याशिवाय हाफिज सईदने पाकिस्तान सरकारला भारताशी मैत्री न करण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय जवान काश्मीरमधील लोकांवर अत्याचार करत असल्याचा आरोप हाफिजने केला आहे. काश्मीरमधील लोकांना मदत केली पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे अशी मागणी त्याने पाकिस्तान सरकारकडे केली आहे.