ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १७- भारताचा मोस्ट वॉंटेंड दहशतवादी हाफीज सईद याची भेट घेणे पत्रकार वेद प्रकाश वैदिक यांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) वेदप्रकाश वैदिक यांची चौकशी करण्याची तयारी सुरु केली असून लवकरच त्यांना यासंबंधी नोटीसही पाठवण्यात येईल असे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
पत्रकार वेदप्रकाश वैदिक यांनी पाक दौ-यात मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावा या प्रतिबंधित संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदची भेट घेतली होती. भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची भेट घेतल्याने वैदिक यांच्या टीका होत होती. एनआयए व गृह मंत्रालयानेही हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. एनआयएकडे २६-११ च्या मुंबई हल्ल्याचा तपास आहे. सईदही याच प्रकरणात मुखअय आरोपी आहे. मोस्ट वॉँटेड आरोपीला भेटणा-या कोणत्याही व्यक्ती तपास यंत्रणा चौकशी करु शकते. यानुसार वैदिक यांचीही चौकशी होईल असे समजते. भेटीत सईद आणि वैदिक यांच्यात काय चर्चा झाली याविषयी माहिती घेतली जाईल. मुंबई हल्ल्यातील साक्षीदार म्हणून त्यांची चौकशी होईल. मात्र यात काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांना आरोपीही ठरवले जाऊ शकते असे वरिष्ट अधिका-यांनी सांगितले.