देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच इतरही अनेक आजारांनी डोकं वर काढलं आहे. याच दरम्यान उत्तराखंडच्या हल्दवानी शहरात असलेल्या सुशीला तिवारी सरकारी रुग्णालयात सध्या रुग्णांची संख्या जास्त आहे. अनेक एकरात पसरलेल्या या रुग्णालयात संपूर्ण कुमाऊंमधून रुग्ण उपचारासाठी येतात. 650 बेडची क्षमता असलेले हे रुग्णालय कुमाऊंमधील सर्वात मोठे रुग्णालय आहे. रूग्णांना रुग्णालयात बेडच मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत रुग्णालयामध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती.
सध्या सुशीला तिवारी रुग्णालयात दररोज 2000 हून अधिक ओपीडी चालवल्या जात आहेत. बहुतांश रुग्णांना ताप, सर्दी, कावीळ, टायफॉइडची लागण होते. याच दरम्यान ज्या रुग्णांची प्रकृती अधिक बिघडली आहे त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. रूग्णांच्या नातेवाईकांची रूग्णालयात राहण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना रूग्णालयाच्या आवारात कॉरिडॉर किंवा इतर ठिकाणी मुक्काम करावा लागत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात व्हायरल ताप, सर्दी, कावीळ, टायफॉइडचे रुग्ण वाढत आहेत. दररोज शेकडो रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. रुग्णालयातील सर्व बेड भरले आहेत. त्यानंतरही डॉक्टर आणि कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. डॉ.अरुण जोशी पुढे म्हणाले की, येथून एकही व्यक्ती उपचाराविना निघून जाऊ नये, असा रुग्णालय प्रशासनाचा प्रयत्न आहे.
रुग्णांना दाखल करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचा विचार केला जात आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या सुशीला तिवारी रुग्णालयातील उपचार इतर सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यंत स्वस्त आहेत. इथे ओपीडीचा फॉर्म पाच रुपये आहे. तर हल्द्वानीच्या बेस हॉस्पिटलच्या ओपीडी प्रिस्क्रिप्शनसाठी 28 रुपये मोजावे लागतात. त्याच बरोबर एक्स-रे, अल्ट्रासाऊंड, MRI यासह सर्व प्रकारच्या चाचण्या देखील अत्यंत कमी खर्चात केल्या जातात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.