हल्द्वानी: उत्तराखंडमधील हल्द्वानी जिल्ह्यातील वनभूलपुरा येथील मलिकच्या बागेत अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक आणि हल्ल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गुरुवारी सरकारी जमिनीवर बांधलेले मदरसा आणि धार्मिक स्थळ बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. या कारवाईला स्थानिकांनी विरोध करत पोलिसांवर दगडफेक सुरू केली. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि संतप्त जमावाने वनभूलपुरा पोलीस ठाणे पेटवून दिले.
तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हिंसाचारग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, परिसरातील सर्व शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण हल्द्वानी शहराचे छावणीत रूपांतर झाले आहे. जखमींमध्ये अनेक पोलिस, सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच, जिल्ह्यात पोलीस, पीएसी आणि निमलष्करी दले मोर्चेबांधणी करत आहेत. गुरुवारी रात्रभर प्रशासन दंगलखोरांची ओळख पटवण्यात व्यस्त होते.
हिंसाचारानंतर सीएम पुष्कर धामी यांनी हल्दवानी येथील वनभुलपुरा येथे बेकायदा बांधकाम हटवताना पोलीस आणि प्रशासन अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. अशांतता पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच, याबाबत महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय यांनी सांगितले की, "प्रार्थनास्थळाची जागा पूर्णपणे बेकायदेशीर असून, त्याजवळील तीन एकर जागा यापूर्वी महापालिकेने ताब्यात घेतली होती. बेकायदा प्रार्थनास्थळाची जागा सील करण्यात आली होती आणि आता ती जमीनदोस्त करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ काही लोकांनी दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येत आहे."