१ एप्रिलपासून लागू होणाऱ्या वेतन संहितेला केंद्र सरकारने गेल्याच महिन्यात ब्रेक लावला. अनेक राज्यांनी अद्याप त्यासंदर्भातील तयारी न केल्याचे कारण त्यासाठी पुढे करण्यात आले. नव्या वेतन संहितेमुळे अनेक बदल होणे अपेक्षित आहेत. त्यात सरकारी नोकरांच्या पदरातही बरेच लाभ पडणार आहेत...
कामाचे तास वाढणार
नव्या वेतन संहितेनुसार कामाचे तास वाढणार आहेत.कामाच्या तासांत कमाल १२ तासांपर्यंत वाढ करण्याचे नव्या वेतन संहितेत प्रस्तावित आहे.त्यातही कर्मचाऱ्याने कामाच्या विहित तासांव्यतिरिक्त आणखी १५ ते ३० मिनिटे काम केले तर तो ओव्हरटाइम गणला जाणार आहे.तसेच कर्मचाऱ्याला सलग पाच तास काम करण्यास ही संहिता अटकाव करते. एखाद्या कर्मचाऱ्याने सलग पाच तास काम केल्यास त्याला अर्ध्या तासाची सुट्टी दिली जावी, असा नियम नव्या संहितेत आहे.
काय आहे वेतन संहिता
केंद्र सरकारने ४४ केंद्रीय कामगार कायद्यांपैकी २९ कायदे एकत्रित करून नवीन वेतन संहिता तयार केली आहे.वेतन संहिता, २०१९ (कोड ऑफ वेजेस) असे त्याचे नाव असून गेल्या वर्षी संसदेत त्यास मान्यता देण्यात आली.ही संहिता सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच लागू होणार आहे.