जर तुम्ही अर्ध्या लीटर दुधाची पिशवी रोज विकत घेत असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. अर्ध्या लीटर दुधाच्या पिशवीची किंमत वाढणार असून एक लीटर दूध जुन्याच किंमतीत मिळणार आहे. केंद्र सरकारनेच देशभरातील सर्व दूध डेअरींना असे करण्याचे आदेश दिले आहेत.
साधारण कुटुंब छोटे असल्याने अर्धा लीटरच्याच पिशव्यांमधून दूध घेतले जाते. मात्र, हे प्लॅस्टिक एकदाच वापरले जात असल्याने प्लॅस्टिक कचरा वाढत चालला आहे. यामुळे एकदाच वापरता येणारे प्लॅस्टिक कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
पशूपालन आणि डेअरी सचिव अतुल चतुर्वेदी यांनी अमूलसह अन्य प्रमुख दूध उत्पादक संघांना अर्धा लीटक दुधाच्या पिशव्यांचे उत्पादन कमी करण्यास सांगितले आहे. याचबरोबर एक लीटर दुधाच्या पिशव्यांचा दुसऱ्यांदा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच एक लीटरची पिशवी परत दिल्यास ग्राहकांना सूट देण्यासही सांगितले आहे.
दुधाशिवाय दही आणि दुग्धजन्य उत्पादनांसाठी प्लॅस्टिक वापरले जाते. याचा एकदाच वापर होतो. अशाप्रकारचे एकदाच वापरता येणारे प्लॅस्टिक कमी करण्यास सांगण्यात आले आहे. किंमत वाढविल्यास लोक आपोआप खरेदी कमी करतील, अशी आशा सरकारला आहे. यामुळे अर्ध्या लीटर पिशवीच्या किंमती वाढविण्यात येणार आहेत.
रस्ते बांधणीसाठी वापररिकाम्या पिशव्यांचा वापर रस्ते बांधणीसाठी करण्यात येणार आहे. यासाठी या वापरलेल्या पिशव्या द्याव्यात तसेच ऑक्टोबरपासून अर्धा लीटर पिशव्यांचे उत्पादन कमी करावे, असे म्हटले आहे.