Hamid Ansari Nusrat Mirza: पाकिस्तानला भारताबद्दलची माहिती पुरवण्याच्या आरोप; हमीद अन्सारींनी दिलं सडेतोड स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 08:10 PM2022-07-13T20:10:55+5:302022-07-13T20:12:02+5:30
हमीद अन्सारी २००७ ते २०१७ या काळात भारताचे उपराष्ट्रपती होते.
Hamid Ansari Nusrat Mirza: नुसरत मिर्झा या पाकिस्तानी पत्रकाराच्या दाव्याने भारताच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून वाद वाढल्यानंतर खुद्द माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीच या संदर्भात स्पष्टीकरण दिले. 'मी नुसरत मिर्झा यांना कधीही फोन केलेला नाही किंवा भेटलेलो नाही', असे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी स्पष्ट केले. मीडियामध्ये माझ्याबाबत सुरू असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. माझ्याविरोधात खोटे बोलले जात आहे आणि त्यांच्यात भाजपाच्या अधिकृत प्रवक्त्याचाही समावेश आहे, असा उलट आरोपही त्यांनी केला.
भाजपाने काय केले आरोप?
एका पाकिस्तानी पत्रकाराच्या खुलाशानंतर भाजपने काँग्रेस नेते आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी खुलासा केला की, तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांना पाच वेळा भारतात आमंत्रित केले होते. अन्सारींनी या दरम्यान भारतासंबंधी अति संवेदनशील आणि गोपनीय माहिती त्यांना दिली. ही माहिती ISI सोबत शेअर करुन भारताविरोधात वापरली गेली.'
हमीद अन्सारींचे स्पष्टीकरण
हमीद अन्सारी म्हणाले की, सध्या अशा बातम्या दिल्या जात आहेत की भारताचे उपराष्ट्रपती या नात्याने मी पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांना निमंत्रित केले आहे. नवी दिल्लीत 'दहशतवाद' या विषयावर आयोजित कार्यक्रमात मी त्यांची भेट घेतली. आणि जेव्हा मी इराणमध्ये भारताचा राजदूत होतो तेव्हा मी राष्ट्रहिताच्या विरोधात वागलो. पण हे सारं तथ्यहीन आहे. उपराष्ट्रपतींकडून परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्याची प्रक्रिया सरकारच्या सल्ल्यानुसार केली जाते. त्यात प्रामुख्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा समावेश असतो ही बाब सर्वांनाच ज्ञात आहे आणि ते सत्य आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की मी त्या व्यक्तीला कधीही आमंत्रित केले नाही आणि कधीही भेटलेलो नाही.
११ डिसेंबर २०१० रोजी दहशतवाद या विषयावरील परिषदेचे उद्घाटन मी केले होते. नेहमीप्रमाणे, पाहुण्यांची यादी आयोजकांनी तयार केली होती. मी त्यातील कोणालाही कधीही फोन केला नाही किंवा भेटलेलो नाही. इराणमधील राजदूत माझ्या कामाची सर्व माहिती त्या वेळच्या सरकारकडे होती. मी राष्ट्रीय सुरक्षेशी बांधील आहे आणि अशा प्रकरणांवर प्रतिक्रिया देणे टाळतो. या संबंधीची सर्व माहिती भारत सरकारकडे आहे आणि याबाबतचे सत्य सांगणे हा त्यांचा अधिकार आहे. तेहरानमधील माझ्या कार्यकाळानंतर मला UNSC मध्ये भारताचा स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले आणि तेथे माझ्या कार्याला देश-विदेशात मान्यता मिळाली हेदेखील रेकॉर्डवर आहे, याचीही हमीद अन्सारी यांनी आठवण करून दिली.