पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी मोठा रेल्वेअपघात झाला. एका मालगाडीने सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला जोरदार धडक दिली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. मालगाडीचा लोको पायलट आणि पॅसेंजर ट्रेनच्या गार्डचाही मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे.
न्यू जलपाईगुडी स्टेशनपासून ३० किमी अंतरावर असलेल्या रंगपानी स्टेशनजवळ सकाळी ८.५५ च्या सुमारास हा अपघात झाला. मालगाडीच्या इंजिनला धडकल्यानंतर कांचनजंगा एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा जया वर्मा सिन्हा यांनी सांगितलं की, मालगाडीने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली. सिन्हा यांनी कबूल केलं की रेल्वेची 'कवच' (ट्रेन टक्करविरोधी यंत्रणा) गुवाहाटी-दिल्ली मार्गावर सक्रिय नव्हती, जिथे अपघात झाला. रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांनी अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.
या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याठिकाणी स्थानिक नागरिकांनी सोमवारी बकरी ईद साजरी केली नाही. संपूर्ण गाव बचाव आणि मदत कार्यात गुंतलं होतं. तरुणांच्या ग्रुपने जखमींना बोगीतून बाहेर काढून मेडिकल कॉलेजमध्ये पाठवलं. या संपूर्ण घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी आज तकशी बोलताना दिली आहे.
हा रेल्वे अपघात सिलिगुडीच्या निर्मलज्योत भागात झाला. अपघातामुळे निर्मलज्योत परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी बकरी ईद साजरी केली नाही. आता इथले लोक आज म्हणजेच मंगळवारी बकरी ईद साजरी करतील. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, अपघातामुळे शोकाचे वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे हा आम्ही निर्णय घेतला आहे. अपघाताची माहिती ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं.
कोणाचा हात कापला गेला, कोणाचा पाय... तर कोणाच्या डोक्याला जखमा होत्या. आम्ही त्या लोकांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं असं तरुणांनी सांगितलं आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून बचावकार्यात मदत केली. एका स्थानिकाने सांगितलं की, हा अपघात सकाळी झाला. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा खूप मोठा आवाज आला.
एमडी हसनने सांगितलं की, मदतीसाठी लोक जोरजोरात ओरडत होते. किंचाळत होते. आम्ही तिथे जाऊन पाहिलं तर लोक बोगीत अडकले होते. आम्ही त्यांना बाहेर काढून उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवलं. आम्ही लोकांना कसं तरी बाहेर काढलं. आमच्या वाहनातून सुमारे १२-१५ लोकांना रुग्णालयात पाठवण्यास मदत केली. या अपघातात कांचनजंगा एक्स्प्रेसच्या मागील दोन बोगींचं पूर्ण नुकसान झालं आहे.