अध्यक्षपदाची धुरा प्रियांका गांधींकडे सोपवा; चिंतन शिबिरात काँग्रेस नेत्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 05:37 AM2022-05-15T05:37:13+5:302022-05-15T05:37:59+5:30
चिंतन सुरू असताना पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क
उदयपूर : काँग्रेसच्या चिंतन शिबिरात पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रियांका गांधी यांच्याकडे सोपविण्याची मागणी पुढे आली.
अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत आचार्य प्रमोद कृष्णन यांनी सोनिया यांच्या समक्ष हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष व्हावे, ही सगळ्यांची इच्छा आहे. हे पद त्यांनी स्वीकारावे यासाठी २ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु ते तयार नाहीत. ते यासाठी राजी नसतील तर प्रियांका गांधी यांच्याकडे अध्यक्षपद सोपवा. यावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी कृष्णन यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु कृष्णन यांनी त्यास दाद दिली नाही. नंतर अनेक नेत्यांनीही कृष्णन यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. प्रियांका गांधीही यावेळी उपस्थित होत्या.
बैठकीतील मुद्दे...
- प्रियांका यांना केवळ उत्तर प्रदेशपुरते मर्यादित ठेवणे योग्य नाही.
- दोन वर्षांपासून पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. स्वत:चे घर आधी मजबूत करू तेव्हाच भाजपशी लढता येईल, यावर नेत्यांचे एकमत.
- ऑगस्टपर्यंत अध्यक्ष निवड करणे आहे. मात्र, अजून यासंदर्भात पक्षात स्पष्टता नाही.
- चिंतन शिबिराच्या माध्यमातून अध्यक्षपदाबाबत ठोस संदेश जनतेत जाणे महत्त्वाचे आहे.
सुनील जाखड यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
उदयपूर : चिंतन सुरू असताना पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. जाखड यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून हे जाहीर केले. त्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची स्तुती करताना ते म्हटले की, ते चांगले व्यक्ती आहेत. मात्र, काही लोकांनी त्यांना घेरले आहे. राहुल गांधी यांच्यामुळे मी पक्षात होतो.