पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशेने उठणारा हात कापला जाईल अशी खुलेआम धमकी बिहार भाजपा प्रदेशाध्यक्षाने दिली आहे. पाटणा येथे एका रॅलीत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी मोदींच्या विरोधात बोलणा-यांना सक्त ताकीदच दिली आहे. मोदींच्या विरोधात हात उचलला तर एकतर तो तोडला जाईल किंवा कापला जाईल अशी धमकी नित्यानंद राय यांनी दिली आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
'नरेंद्र मोदी प्रचंड अडचणींचा सामना करत पंतप्रधानपदी पोहोचले आहेत. देशाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला आहे. आपल्या सर्वांसाठी ही गर्वाची गोष्ट आहे. जर कोणी त्यांच्या विरोधात हात उचलला तर तो आधी तोडण्यात येईल, आणि नंतर कापला जाईल', असं नित्यानंद राय बोलले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाचा उल्लेख करताना नित्यानंद राय यांनी सांगितलं की, 'नरेंद्र मोदींनी परिस्थितीवर मात करत पंतप्रधानपद मिळवलं आहे. गरिबीतून मोदी इथपर्यंत पोहोचल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्यांचाप्रती आदर असला पाहिजे'. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'त्यांच्याविरोधात उठणारं बोट, उठणारे हात...आपण सर्वांनी मिळून...एक तर तोडले पाहिजेत, किंवा गरज पडल्यास कापले पाहिजेत'.
यावेळी उपमुख्यमंत्री सुशील मोदीदेखील मंचावर उपस्थित होते. सभा संपल्यानंतर जेव्हा नित्यानंद राय यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सारवासारव करत सांगितलं की, 'मी बोटं तोडण्याचं आणि हात कापण्याचं उदाहरण दिलं होतं. मला सांगायचं होतं की, देशाच्या अभिमान आणि सुरक्षेविरोधात काम करणा-या लोकांना आपण नियंत्रणात ठेवलं पाहिजे'. आपला इशारा कोणतीही व्यक्ती किंवा विरोधी पक्षाकडे नव्हता असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.
डिसेंबर 2016 मध्ये नित्यानंद राय यांनी बिहारचं प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं होतं. त्यांच्या मदतीने बिहारमध्ये आपला दबदबा कायम ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत त्यांना उजियारपूरमधून उमेदवारीही देण्यात आली होती. राज्यात सुशील मोदी, नंदकिशोर आणि प्रेमकुमार यांच्यासोबत एक वरिष्ठ नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.