मदुराई : तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील पल्लीसंथाई थिडाल या गावी जमिनीखाली नागरी वस्त्यांचे अस्तित्व दर्शवणाऱ्या काही प्राचीन वास्तू रचना आढळल्या असून त्यांचे हडप्पा- मोहेंजेदडो संस्कृतीशी साधर्म्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.पुरातत्त्व विभागाच्या बेंगळुरू येथील सहाव्या शाखेने उत्खननाचा दुसरा टप्पा चालविला असून काही वस्त्या हडप्पासारख्या मोठ्या असल्याचे निष्पन्न झाले. त्या काळी नागरी वस्त्यांमध्ये सुविधा असल्याचेही दिसून आले. २०१३-१४ मध्ये वैगाई नदीच्या पात्रात उत्खनन पार पाडण्यात आले होते. २०१५ मध्ये त्या ठिकाणी अनेक प्राचीन वस्तू आढळून आल्या. त्यात लोखंड आणि मातीच्या वस्तूंचा समावेश होता. काही वस्तू विदेशी बनावटीच्या तर काही गावठी प्रकारच्या होत्या. भांड्यावरील कलाकुसर तिसऱ्या शतकातील आहे. त्यावेळी विदेशी व्यापार अस्तित्वात असल्याच्या खुणाही त्यातून मिळतात. प्राचीन नागरी वस्त्यांच्या निष्कर्ष आल्यानंतर पुरातत्त्व विभागाने दुसऱ्या टप्प्यात किलाडी गावाची निवड केली. या गावातील ८० एकर जमिनीवर ३.५ किमी परिघात उत्खनन सुरू असून जमिनीत गाडल्या गेलेल्या अनेक वास्तूंच्या रचना आढळून येताच तामिळनाडूत नागरी संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळून आल्यामुळे उत्सुकता वाढली आहे. (वृत्तसंस्था)
तामिळनाडूत आढळल्या हडप्पासारख्या वस्त्या
By admin | Published: May 31, 2016 3:53 AM