जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा इथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जिगरबाज वीर कर्नल आशुतोष शर्मा यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. जयपूरमध्ये लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी 'आशुतोष शर्मा अमर रहे'च्या घोषणा आसमंतात घुमल्या आणि उपस्थितांचे डोळे पाणावले, अंग शहारले. भारतमातेच्या या शूरवीर सुपुत्राला त्याच्या कुटुंबीयांसह सगळ्यांनी अखेरचा सलाम केला.
कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामधील एका गावात शनिवारी एका घरात लपलेल्या काही दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. ही माहिती मिळताच, लष्कराच्या एका तुकडीने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने या भागाला घेराव घातला होता आणि नागरिकांची सुखरूप सुटका केली होती. मात्र त्याचवेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला. त्याला चोख प्रत्युत्तर देत, 15 तास चाललेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं, पण आपले पाच वीर शहीद झाले होते. कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद यांच्यासह दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीसचे उपनिरीक्षक शकील काझी यांना हौतात्म्य आलं होतं.
२१ राष्ट्रीय रायफल युनिटचे नेतृत्व सांभाळणाऱ्या कर्नल आशुतोष यांना आलेलं वीरमरण ही भारतीय लष्कराची मोठी हानीच आहे. त्यांना दोन वेळा शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होतं. पाच वर्षांत पहिल्यांदाच भारतीय लष्करानं एवढ्या वरिष्ठ दर्जाचा अधिकारी गमावला आहे. काश्मीरमध्ये 'टायगर' अशीच त्यांची ओळख होती.
मातृभूमीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या, तिच्या रक्षणासाठी शत्रूशी दोन होत करणाऱ्या कर्नल आशुतोष यांच्या मनाचा हळवा कोपरा आणि त्यात आईला असलेलं विशेष स्थान एका कवितेतून सहज लक्षात येतं. 28 एप्रिलला आशुतोष यांनी आपल्या आईसाठी लिहिलेली एक कविता वीरपत्नी पल्लवी यांनी माध्यमांना दिली आहे.
वो अक्सर घर को सम्भालती, संवारती रहती हैमेरी मां मेरे घर आने की राह निहारती रहती हैलौट कर आऊंगा मैं भी पंछी की तरह मैं भी एक दिनवो बस इसी उम्मीद में दिन गुजारती रहती हैउससे मिले हुए हो गया पूरा एक साल लेकिनउसकी बातों में मेरे सरहद पर होने का गुरूर दिखता है।
या कवितेच्या प्रत्येक पंक्तीतून आईवरची माया, ममता, आस्था सहज जाणवते.
लष्कराचा युनिफॉर्म म्हणजे कर्नल आशुतोष यांचं सर्वस्व होता. त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल आम्हाला अभिमान आहे, अशा भावना वीरपत्नी पल्लवी यांनी व्यक्त केल्या.