नवी दिल्ली, दि. 6 - बलात्काराच्या गुन्ह्यात गुरमीत राम रहीमला तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर त्याची जागा कोण घेणार ? याविषयी विविध अंदाज बाधण्यात येत होते. पण आता डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापन समितीकडून यासंबंधी मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे वारसदाराचा वाद संपुष्टात येणार आहे. गुरमीत राम रहीम तुरुंगातूनच डे-याचा कारभार हाकणार असल्याची माहिती व्यवस्थापन समितीने दिली आहे.
त्यामुळे तूर्तास तरी वारसदाराचा प्रश्न मिटला आहे. हनीप्रीत किंवा राम रहीमच्या मुलांपैकी कोणाचीही डे-याच्या प्रमुखपदी नियुक्ती होणार नाही. राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर त्याची जागा कोण घेणार याविषयी बरीच चर्चा रंगली होती. काही जण हनीप्रीतचे नाव घेत होते. हनीप्रीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. पण दोघांच्या संबंधांबद्दल बरीच उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
डे-याच्या प्रमुखपदी नव्या नियुक्तीचा सध्या कोणताही विचार नाही अशी माहिती विपासना इन्सानने दिली. त्या डे-याच्या व्यवस्थापन समितीच्या प्रमुख आहेत. डेरा समितीने हनीप्रीतबद्दल आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. हनीप्रीतचा डे-यामध्ये कोणताही हिस्सा नाही किंवा तिचा कोणताही संबंधही नाही. त्यामुळे हनीप्रीत डे-याची वारसदार होऊ शकत नाही.
तुरुंगात राम रहीमला हनीप्रीतच्या हातून हवा मसाज!
बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झालेला गुरमीत राम रहीम सध्या हनीप्रीत इन्सानच्या आठवणीने व्याकुळ झाला आहे. तुरुंगात हनीप्रीतला सोबत ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी त्याने याचिकाही केली होती. पण सीबीआय कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली. हनीप्रीत गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. या दोघांमध्ये वडील आणि मुलीचे नाते असले तरी, त्यांच्या संबंधांबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत. हनीप्रीतपासून विभक्त झालेल्या तिच्या नव-याने मागच्या आठवडयात राम रहीम आणि हनीप्रीतमध्ये लैंगिक संबंध असल्याचा आरोप केला होता.
हनीप्रीत राम रहीमची मदतनीस असण्याबरोबरच त्याची फिजियोथेरपीस्ट तसेच त्याला मसाजही करायची. सध्या हरयाणा पोलिसांनी हनीप्रीत इन्सान विरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे. राम रहीमला कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्याला पळवण्याचा कट रचला होता. त्यात हनीप्रीत सहभागी असल्याचा आरोप आहे.