नवी दिल्ली : दिल्लीतील नांगल भागात नऊ वर्षे वयाच्या एका दलित मुलीवर बलात्कार तसेच तिचा खून करून घाईघाईने अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यावरून आता राजकारण तापले आहे. या प्रकरणातील चार दोषींना फाशी द्या, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व मुलीच्या नातेवाइकांनी केली आहे, तसेच केजरीवाल, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतंत्रपणे या मुलीच्या पालकांना भेटून त्यांचे सांत्वन केले.मुलीच्या पालकांना दहा लाख रुपयांची मदत केजरीवाल सरकारने जाहीर केली आहे. दिल्ली ही केंद्र सरकारच्या अख्यत्यारीत येते. दलित मुलीच्या बलात्कार व खून प्रकरणावरून विरोधी पक्ष टीका करत आहेत; मात्र या प्रकरणाबाबत एकाही केंद्रीय मंत्र्याने चकार शब्दही उच्चारलेला नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी व भाजप नेते संबित पात्रा यांच्यामध्येही या प्रकरणावरून शाब्दिक चकमक उडाली आहे. रविवारी या मुलीवर घाईगर्दीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे फोरेन्सिक पुरावे गोळा करणाऱ्या पथकाला त्या मुलीच्या पायांचे अवशेष व चितेची राख इतक्याच गोष्टी हाती लागल्या. या बलात्कार व हत्याप्रकरणात अटक केलेला पुजारी राधेश्याम, त्याच्यासोबत काम करणारे सेवक लक्ष्मीनारायण व कुलदीप व स्थानिक रहिवासी सलीम या चौघांना फाशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मुलीच्या आईने या चार जणांची ओळख पटविली आहे. बलात्कारपीडित मुलीचे नातेवाईक नांगल भागात राहतात. या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवावे, अशी मागणी समाजाच्या सर्वच स्तरांतून होत आहे. दलित मुलीवरील बलात्कार प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे.
बलात्कार, हत्याप्रकरणी चौघा दोषींना फाशी द्या, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पालकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 8:44 AM