गुवाहाटी - आसाममध्ये एक हँगिंग ब्रिज तुटून मोठी दुर्घटना झाली आहे. त्यामुळे अनेकजण नदीत पडले असून, जखमींमध्ये शाळेतून घरी येत असलेल्या सुमारे ३० विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सोमवारी ज्यावेळी हा हँगिंग ब्रिज तुटला तेव्हा सर्व विद्यार्थी शाळेतून घरी येत होते. ही दुर्घटना करीमगंजच्या राताबारी विधानसभा क्षेत्रातील चेरागिक परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार हा हँगिंग ब्रिज आसाममधील सिंगला नदीवर बांधण्यात आलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक शाळा आणि अन्य ठिकाणी जाण्यासाठी या ब्रिजचा वापर करत आहेत. सोमवारी चेरागी विद्यापीठ हायस्कूलमधील विद्यार्थी शाळेतून घरी येत होते. तेव्हा अचानक हा ब्रिज तुटला. त्यामुळे त्यावरून जात असलेले विद्यार्थी नदीत पडले. ब्रिज तुटत असताना पाहून आजूबाजूला असलेल्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत पुलाच्या दिशेने धाव घेतली आणि नदीत पडलेल्या विद्यार्थ्यांना वाचवले.
या घटनेमध्ये किमान ३० विद्यार्थी जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गाववाल्यांनी सांगितले की, हा हँगिंग ब्रिज तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता.