लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये १९ नोव्हेंबरपासून डीजीपी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सहभागी होतील. डीजीपी परिषदेला सर्व राज्यांतील पोलीस महासंचालक, डीजीपींसह बडे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात लखनऊ पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीनं सूचना दिल्या आहेत.
लखनऊमध्ये पहिल्यांदाच डीजीपी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. शहीद पथावर असलेल्या पोलीस मुख्यालय सिग्नेचर बिल्डिंगमध्ये परिषद होत आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलीस मुख्यालयाचं निरीक्षण केलं. या दौऱ्यादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. सिग्नेचर इमारतीच्या आसपास असलेल्या अपार्टमेंटमधील नागरिकांना १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान बाल्कनीत कपडे वाळत घालू नका, अपार्टमेंटमध्ये एखादी नवी व्यक्ती राहायला आल्यास त्याची सूचना द्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गोमतीनगरच्या एसीपींनी सुरक्षेच्या दृष्टीनं या सूचना दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी डीजीपी परिषदेत सहभागी होण्यासाठी काल संध्याकाळी लखनऊला पोहोचले. ते आज आणि उद्या परिषदेत सहभागी होतील. गृहमंत्री अमित शाह यांनी काल परिषदेचा शुभारंभ केला. कालपासून सुरू झालेली परिषद उद्या संपेल. या परिषदेला पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.