मेरठ - उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एका पोलीस ठाण्यात अजब-गजब घटना उघडकीस आली आहे. आरोपींना सळो की पळो करुन सोडणारे पोलिसवाले येथील एका पोलीस स्टेशनमध्ये भूताच्या नावाखाली थरथर कापत आहेत. यूपीतल्या टीपीनगर पोलीस ठाण्यात असणाऱ्या कथित भूताच्या चर्चेने सर्वांमध्ये दहशतीचं वातावरण पसरवलं आहे.
भूताच्या भीतीमुळे येथील ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी हनुमान चालिसा वाचन करण्यास सुरुवात केली आहे. सांगितलं जातं की, पोलिसांच्या छळामुळे आत्महत्या करणाऱ्या युवकाची आत्मा या ठाण्यात दिसते. मात्र पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला नाही. एका हिंदी वृत्तपत्राने छापलेल्या बातमीनुसार एका युवकाला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी स्टेशनला आणलं होतं. त्यावेळी त्याने आत्महत्या केली. काही लोकांचे म्हणणं आहे की, पोलिसांनी या युवकाचा छळ केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी या युवकाची आत्मा पोलीस ठाण्यात भटकत आहे. पोलिस सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे साधारणपणे एक आठवड्यापूर्वी रात्रीच्या वेळी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाण्यात भूत बघितल्याचा दावा केला आहे.
या घटनेनंतर पोलीस ठाण्यात पोलिसांनी हनुमान चालिसा वाचन करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस स्टेशनचे प्रभारी यांच्याकडून पूजेचं आयोजन केलं गेलं. इतकचं नाही तर पोलीस ठाण्यात हनुमानाची मूर्ती बसविण्यात येणार असल्याचंही माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र ठाण्याचे प्रभारी दिनेश चंद्र यांनी हा दावा फेटाळून लावत पोलीस ठाणे माझ्या घरासारखे आहे. त्यामुळेच मी पूजा केली आहे. भूत-प्रेतासारखी कोणतीही गोष्ट नाही असं ते म्हणाले.
यापूर्वीही मुजफ्फरनगर येथील ककरौली पोलीस ठाण्यात असाच प्रकार समोर आला होता. या ठाण्यामध्ये एका दशकात सापांचा घेरा पडत होता. भूताची अफवाह पसरली होती. पोलीस ठाण्यामध्ये प्रवेश करताना घाबरत असतं. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाण्यामध्ये पूजेचं आयोजन केलं होतं.