लखनौ : उत्तर प्रदेशातील आबिद अल्वी या युवकाने हनुमान चालिसेचा उर्दूत अनुवाद केला आहे. यापूर्वी प्रसिद्ध उर्दू कवी अन्वर जलालपुरी यांनी श्रीमद् भगवद्गीतेचे उर्दू रूपांतर प्रकाशित करीत लक्ष वेधून घेतले होते.जौनपूर येथे राहणाऱ्या आबिदने आता शिव चालिसा प्रार्थनेच्या अनुवादाची योजना आखली आहे. अशा लेखनकार्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समुदायातील लोकांना परस्परांची संस्कृती आणि श्रद्धा समजून घेण्यास मदत होईल. प्रत्येक बंधात सहा ओळी याप्रमाणे एकूण १५ बंधात हनुमान चालिसेचा अनुवाद केला आहे. मी मुसाददास यांच्याप्रमाणे सहा ओळीत भाषांतर केले. चारोळीप्रमाणे मुसाददास यांनी सहा ओळींची पद्धत आणली होती, असे त्याने सांगितले. विदेशी भाविकांमुळे कल्पना सुचली मी वाराणसीला भेट दिली तेव्हा काही विदेशी भाविकांनी लोकांना हनुमान चालिसा म्हणायला सांगितले होते. त्यामुळे माझ्या मनात अनुवादाची कल्पना आली. मी हिंदीचा विद्यार्थी असलो तरी हनुमान चालिसा उर्दूत आणण्याचे काम हाती घेतले. चुका टाळण्याची खबरदारी घेत मी अनुवाद केला. त्यासाठी मला तीन महिने लागले, अशी माहितीही त्याने दिली. उर्दूची पुस्तके हिंदीत आणि हिंदीची पुस्तके उर्दूत भाषांतरित करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली. लोकांनी परस्परांना समजून घेतले तर बंधुभाव, ऐक्य आणि प्रेमाची भावना बळकट होण्यास मदत होईल, त्यामुळे मी हे लेखन केले आहे, असे तो म्हणाला.ही तर कुराणची शिकवण लेखन करताना विरोध झाला नाही काय? यावर आबिद म्हणाला की, अनुवाद करण्यात कोणती अडचण येऊ शकते? असा प्रश्न मी अनेकांना केला होता. कोणत्याही किमतीत जातीय सलोखा राखला जावा, ही कुराणची शिकवण असल्याचेच माझ्या मनावर बिंबविण्यात आले. (वृत्तसंस्था)भगवद्गीता जगातील सर्वात मोठे साहित्यगेल्या वर्षी उर्दू कवी आणि लेखक अन्वर जलालपुरी यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील ७०० श्लोकांचे १७०० उर्दू दोह्यात रूपांतर केले होते. जगभरातील शिक्षणात गीता हे सर्वात मोठे साहित्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘उर्दू शायरी मे गीता’ या त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. अन्वर यांनी केवळ श्लोकांचा उर्दू शेरांमध्ये अनुवादच केला नाही तर गीतेचा मूळ अर्थही मिळवून देण्याचा प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्णाचा उपदेश मी जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले होते.
भगवद्गीतेनंतर हनुमान चालिसाही उर्दूत
By admin | Published: August 11, 2015 2:38 AM