उत्तर प्रदेशच्या शाहजहाँजपूरमध्ये १५० वर्षे जुन्या हनुमान मंदिराला जॅक लावून उचलण्यात येत आहे. या मंदिराला येथून शिफ्ट करुन दुसरीकडे प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या ३ महिन्यांपासून हे मंदिरा शिफ्टींगेच काम जॅकच्या सहाय्याने सुरू आहे. ज्यामध्ये, १६ फूट हनुमान मंदिराला यशस्वीपणे पाठिमागे करण्यात आलं आहे. शाहजहाँपूरच्या राष्ट्रीय महामार्गावर बनलेल्या या मंदिराला हटवण्यावरुन मोठा वाद सुरू झाला होता. त्यानंतर, अखेर जॅक मशिनच्या सहाय्याने मंदिराला शिफ्ट करण्याचा अंतिम निर्णय झाला.
तिलहर उपजिल्हाधिकारी राशीकृष्णा यांनी मंदिराचे शिफ्टींग होत असल्यासंदर्भात माहिती देताना म्हटले की, येथील हनुमान मंदिराला यशस्वीपणे पाठिमागे करण्यात आले आहे. तिलहर पोलीस ठाणे क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग २४ च्या मधोमध हे मंदिर होते. तब्बल १५० वर्षे जुने हे मंदिर असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय महामार्ग २४ चे चौपदरीकरण होणार असल्याने कछियाना खेडा नावाच्या जागेवर असलेले हे मंदिर हटविण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यावेळी, स्थानिकांनी मोठा गोंधळ करत या निर्णयाला विरोध केला.
हिंदू संघटनांनीही मंदिर हटविण्याच्या निर्णयाचा विरोध केला. त्यामुळे, मंदिर हटविण्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर, एनएचएआय आणि प्रशासनाने या मंदिरास मशीनच्या सहाय्याने शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मंदिर हटविण्याचा निर्णय झाल्यानंतर स्थानिकांनी या निर्णयाला विरोध केला. तसेच, या निर्णयानंतर अनेक दु:खद घटना घडत असल्याच्या कथाही त्यांनी सांगितल्या आहेत. दरम्यान, हनुमान मंदिराचे पुजारी महंत राम लखन गिरी यांनी हे मंदिर पाठिमागे घेण्यासही विरोध दर्शवला आहे. मंदिर जॅकच्या सहाय्याने मागे घेण्यालाही आमचा विरोध आहे. प्रशासनाच्या या कारवाईबाबत आम्हाला काहीही माहिती नाही, असे गिरी यांनी म्हटले आहे.