मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजापाध्यक्ष अमित शहा यांचा 'याराना' सर्वपरिचीत आहे. विशेष म्हणजे या दोन मित्रांच्या वयात चक्क 14 वर्ष एक महिना आणि 5 दिवसांचे अंतर आहे. तरीही त्यांच्या मित्रप्रेमातील जवळीक संपूर्ण जगाला माहिती आहे. भारतीय राजकारणाच्या इतिहासातील गांधी-नेहरू, अटल-अडवाणी या जोडींप्रमाणेच मोदी-शहा जोडीही घट्ट मैत्रीचे उत्तम उदाहरण आहे. मात्र, या मैत्रीला 36 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. देशाचं राजकारण बदलवणाऱ्या या जोडीच्या काही रंजक गोष्टीही आहेत.
भारताचे 14 वे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची पहिली भेट 36 वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हापासून अतूट असलेल्या या जोडीला कुणी मैत्री म्हणतं, कुणी भक्ती म्हणतं तर कुणी गुरू-शिष्यही म्हणतं. या जोडीने गुजरातच्या राजकीय विश्वात अनेक इतिहास घडवले. तर, देशाच्या राजकारणातही गेल्या 4 वर्षांपासून यशस्वी घोडदौड सुरूच आहे. मोदींचा जन्म 17 सप्टेबर 1950 साली गुजरातच्या वडनगर येथे झाला आहे. तर, अमित शहा यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 साली मुंबईतील एका गुजराती वैष्णव परिवारात कुटुंबात झाला आहे. दोन वेगवेगळ्या शहरात जनन घेऊनही आणि दोघांच्या वयात तब्बल 14 वर्षांचे अंतर असूनही केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या एका धाग्याने दोघांना घट्ट बांधले आहे.
नरेंद्र मोदी हे बाल स्वयंसेवक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले होते. त्यानंतर, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णकालीन कार्यकर्ता बनले. तर, अमित शहा यांनीही वयाच्या 14 व्या वर्षी बाल स्वयंसवेक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला होता. मोदी आणि अमित शाह यांची पहिली भेट 1982 साली झाली. त्यावेळी मोदी आरएसएसचे पूर्णकालीन स्वयंसेवक होते, तर अमित शहा हे आरएसएसच्या विद्यार्थी संघटनेच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. त्यावेळी आरएसएसकडून नरेंद्र मोदींना अहमदाबादचे जिल्हा प्रचारक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यावेळी अमित शहा यांनी एबीव्हीपीचे सचिव म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली होती. त्यावेळी, सन 1985 मध्ये अमित शहा यांनी गुजरातच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे पोस्टर्स लावण्याचे काम केले होते. मोदी-शहा 1996 भेटीचे कनेक्शन
सन 1986 मध्ये अमित शहा भाजपा युवा मोर्चामध्ये सहभागी झाले होते. भाजयुमोमध्ये अमित शहा राज्य सचिव, उपाध्यक्ष, महासचिव इत्यादी पदावर कार्यरत होते. तर 1986 मध्ये नरेंद्र मोदी हे गुजरात भाजपाचे सचिव बनले होते. त्यावेळी मोदींनी अमित शहा यांना ग्रामीण भागातील महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली होती. सन 1991 मध्ये गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून लालकृष्ण अडवाणी यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी मोदी आणि शहा यांनी त्यांच्या प्रचारासाठी मोठी कष्ट घेतले. त्यामुळे काँग्रेसचे दिग्गज जाआय पटेल यांना 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत करण्यात अडवाणींना यश आले.
गुजरात निवडणुकावेळी 1996 मध्ये माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल आणि नरेंद्र मोदी यांच्या नात्यात काहीसी कटुता निर्माण झाली. मात्र, यावेळीही अमित शहा यांनी केशुभाई पटेलांऐवजी नरेंद्र मोदींसमवेत जाणे पसंत केलं. त्यामुळेच, 2001 मध्ये केशुभाई पटेल यांना पराभूत केल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नरेंद्र मोदींची वर्णी लागली. त्यावेळी, मोदींनीही आपल्या विश्वासू अमित शहा यांना गुजराच्या मंत्रिमंडळात स्थान दिले, त्यावेळी अमित शहा यांचे वय 37 वर्षे होतं. देशाच्या राजकारणात मोदींची एंट्री होतानाही असाच योगायोग किंवा जुळवून आणलेला योग दिसून आला. मे 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच, जुलै 2014 मध्ये अमित शाह यांना निवडणूक प्रचारातील कामाची दखल घेत आणि उत्तर प्रदेश निवडणुकांचे किंगमेकर संबोधत राष्ट्रीय अध्यक्ष बनविण्यात आले. आज अमित शहांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भाजपाला देशाबाहेर वाढविण्यात अमित शहांचे मोठे योगदान असल्याचे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.