नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच 69 वा वाढदिवस देशभरात साजरा करण्यात येत आहे. मात्र, मोदींच्या जन्म तारखेवरुन वाद उद्भवला आहे. कारण, गुजरात विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रमाणपत्रामध्ये मोदींची जन्मातारीख वेगळी आहे. या प्रमाणपत्रात मोदींची जन्मतारीख 29 ऑगस्ट 1949 आहे, पण कुटुंबीयांच्यामते 17 सप्टेंबर 1949 हा मोदींचा जन्मदिवस आहे. काँग्रेस नेता शक्तिसिंह गोहिल यांनी महाविद्यालयातील नोंदणी प्रत दाखवून मोदींच्या नव्या जन्मतारखेचा दाखल दिला होता.
मोदींनी एमएन कॉलेज वीसनगर येथून प्री-सायन्स (12 वी) ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मात्र, मोदींच्या पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्रावर मोदींची जन्मतारीख वेगळी आहे. गोहिल यांनी दाखवलेल्या नोंदणी प्रतीनुसार मोदींचे नाव नरेंद्र दामोदरदास मोदी आहे. या कागदपत्रावर मोदींची जन्मतारीख 29 ऑगस्ट 1948 असल्याचं दिसून येतं. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी मोदींच्या जन्मतारखेचा वाद पुढं आणला आहे. मोदींनी आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वाहन परवाना यांवरील जन्मतारीख दाखवली पाहिजे, असेही गुजरातमधील काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय. तसेच मोदींच्या शैक्षणिक कागदपत्रांवरुन शक्तिसिंह यांनी मोदींना लक्ष्य केलं असून मोदींनी पदवी प्रमाणपत्राबाबत खुलासा करावा, अशी मागणीही शक्तिसिंह यांनी केली होती.
दरम्यान, काँग्रेस नेता शक्तिसिंह यांनी याबाबत गुजरात विद्यापीठात आरटीआयद्वारे तब्बल 70 वेळा माहिती मागविली होती. मात्र, गुजरात विद्यापीठाने माहिती देण्यास नकार दिला आहे. गोपनियतेचे कारण पुढे करत विद्यापीठाने ही माहिती नाकारली आहे.