पुणे, दि. 24 - महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मराठीतून दिल्या आहेत. पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान संस्थेच्या स्थापना दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाषण देत होते. या संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सायंकाळी पंतप्रधानांचे भाषण झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, साबरमती आश्रम निर्माण आणि चंपारण सत्यग्रहला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्ष पूर्ण होतायत. भारताच्या स्वतंत्रता आंदोलनला या तिन्ही बाबींनी वेगळी दिशा दिली आहे. त्यामुळे इतिहासात या तिन्ही घटनेला अनन्यसाधारण महत्व आहे. पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान संस्थेच्या स्थापना दिवस कार्यक्रमाला प्रकाश जावेडकर आणि महादेव जाणकर यांनी उपस्थिती दर्शवली होती. बायफच्या कार्यक्रमात आज पुरस्कार वितरण करण्यात आले. बायफमधील सर्व विजेत्यांना मोदी यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या. तसेच उद्यापासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी शेती, शेतकरी आणि त्यांच्या समस्यावर भाष्य केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी सरकारचे काम सुरू आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मोदी यांनी यावेळी मराठीतून भाषणास सुरुवात केली. त्यांनी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मराठीत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी अचानकपणे मराठीत बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी या कार्यक्रमातील पुरस्कार विजेत्यांचे मराठीतून अभिनंदन केले. त्यानंतर उद्यापासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो, असे सांगत मोदींनी भाषणाचा समारोप केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छांचे स्वागत केले. मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनही देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.