नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज 86 वा जन्मदिवस आहे. सन 2004 ते 2014 या 10 वर्षांच्या कालावधीत मनमोहन सिंग यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. युपीए सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र, मनमोहनसिंग यांची प्रतिमा आजही प्रामाणिक, पारदर्शी आणि दूरदृष्टीचा नेता अशीच आहे. वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात त्यांचा उत्साह कायम आहे. तर त्यांचा सहज आणि साधेपणा नागरिकांना नेहमीच भावतो.
डॉ. मनमोनहसिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 साली पंजाबमध्ये जन्म झाला. आज त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षात पदार्पण केलं. त्यामुळे काँग्रेससह देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदीनीही डॉ. मनमोहनसिंग यांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या माजी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी त्यांच्या उत्तम आरोग्य आणि दिर्षायुष्यासाठी प्रार्थना करत असल्याचे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'डॉ. मनमोहनसिंग यांचा जन्मदिवस आमच्यासाठी जुन्या आठवणींना उजाळा देण्याची एक संधी आहे. कारण, त्यांनी राष्ट्राच्या उभारणीसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून निस्वार्थ आणि मौल्यवान योगदान दिले आहे. मी त्यांच्या उत्तम आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी शुभेच्छा देतो, असे राहुल यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. दरम्यान, डॉ. मनमोहसिंग यांना देशातील अनेक दिग्गजांकडून सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देण्यात येत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांकडूनही त्यांच्या कामगिरीला उजाळा देत फेसबूकवरुन त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.