गोष्ट 1995 ची आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 182 पैकी 121 जागा जिंकल्या होत्या. या विजयामध्ये पक्ष सचिव म्हणून नरेंद्र मोदी यांचे महत्वाचे योगदान होते. केशुभाई पटेल हे मुख्यमंत्री झाले. तर मोदी यांचे नेतृत्वाला दुसरा क्रमांक मिळाला. मात्र, ही गोष्ट मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार शंकर सिंह वाघेला यांना फारशी रुचली नाही. त्यांना बहुतांश आमदारांचे समर्थन होते. मात्र, ते मुख्यमंत्री होऊ शकले नसल्याची सल होतीच परंतू दुसरा नंबरचे पदही नसल्याने त्यांनी मोदी यांच्याविरोधात बंड केले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातेय हे पाहून केंद्रीय नेत्यांनी मोदींना दिल्लीमध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला गेला. हा एकप्रकारे वनवासच होता. यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून इतरांनीही मोदींची साथ सोडली. कठीण काळात केवळ एक माणूस त्यांच्यासोबत राहिला. ते म्हणजे अमित शहा.
यानंतर 2010 मध्ये सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटर प्रकरणात अमित शहा यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सीबीआयने त्यांना 25 जुलै 2010 मध्ये अटक केली होती. त्यांना तीन महिने तुरुंगात घालवावे लागले. काही मिडीया रिपोर्टनुसार मोदी यानंतर काहीसे हरवलेले दिसत होते. तसेच त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्य़ासाठी प्रयत्न करत होते. मोदी यांनी यादरम्यान शाह यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेतली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शहा यांना गुजरातमधून हद्दपार केले गेले होते. नंतर शहा यांना या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली.
या दोन्ही घटना मोदी-शहा यांच्या दोस्तीचे पुरावे आहेत. 35 वर्षांच्या या मैत्रीमध्ये अनेक उतार-चढाव आले. परंतू दोघांनीही एकमेकांना साथ दिली. यामुळेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले.
80 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात भेटले होते. यावेळी शहा तरुण कार्यकर्ते तर मोदी संघ प्रचारक होते. 1984 मध्ये मोदी यांना अहमदाबाद जिल्ह्याचे प्रचारक करण्यात आले आणि शहा भाजपाचे कार्यकर्ते झाले. यानंतर या दोघांमधील संबंध वाढीस लागले.
2014 मध्ये मोदी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले गेले. यानंतर भाजपच्या विजयासाठी अमित शहा हेच मुख्य रणनीतिकार म्हणून पुढे आले. यानंतर शहा भाजपचे अध्यक्ष बनले.