नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 48वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं ट्विटरवर #HappyBirthdayRahulGandhi हा हॅश टॅग ट्रेडिंगमध्ये आहे. सोशल मीडियावर राहुल गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासोबत बऱ्याच जणांनी राहुल गांधी हे भावी पंतप्रधान असल्याचेही सांगितले आहे. शिवाय, उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थनादेखील राहुल गांधींसाठी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 19 जून 1970 रोजी राहुल गांधी यांचा जन्म झाला. 2004 पासून राहुल गांधी राजकारणात सक्रीय झाले. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या राजकीय शैलीमध्ये बदल घडवून आणले आहेत. राजकीय प्रवेशापासून ते काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्यापर्यंत, आपल्या 14 वर्षांच्या राजकीय प्रवासात राहुल गांधींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बरेच बदल झाले आहेत
2019 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ते केवळ जाहीर सभांच्या माध्यमातूनच नाही तर सोशल मीडियावरदेखील आक्रमकरित्या हल्लाबोल चढवताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी 2017 मध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर गुजरात आणि कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसनं भाजपाला 'काँटे की टक्कर' दिली.
राहुल गांधींसमोरील आव्हानं आगामी काळात मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे राहुल गांधींसमोर आव्हान आहे. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये देशात भाजपाविरोधी वातावरण निर्माण झाल्याचं दिसत आहे. याचा पुरेपुर फायदा काँग्रेस उचलू शकते. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी जर काँग्रेसनं या तीन राज्यांमध्ये विजय मिळवला तर याचा प्रचंड फायदा काँग्रेसला होऊ शकतो. हा विजय प्रत्यक्षात मिळवण्यासाठी व आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी राहुल गांधी यांनी स्वतः पुढाकार घेत विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्नदेखील सुरू केले आहेत.