नवी दिल्ली - लोकसभा सभागृहात रामदास आठवलेंनीराहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेली राहुल यांचा वाढदिवस आज की उद्या यावरुन चर्चा रंगली. त्यावेळी, आठवलेंनी राहुल यांना शुभेच्छा देताना टोलाही लगावला. तुम्हाल तिथं बसायची संधी मिळाली, म्हणून मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, असे आठवलेंनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
आठवलेंनी आपल्या हटके कवीस्टाईलनेच लोकसभा अध्यक्षांचे स्वागत आणि अभिनंदन केले. राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला. लोकसभेचे 16 वे अध्यक्ष म्हणून सुमित्रा महाजन यांनी कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर, 17 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून आज ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. लोकसभा सभागृहात आठवलेंनी राहुल गांधींना शुभेच्छा देताना टोलाही लगावला. तर, खासदारांचे मनोरंजनही केले.
''तुम्ही खूप प्रयत्न केले, पण लोकशाहीमध्ये ज्यांना लोक पसंत करतात त्यांचीच सत्ता येते. तुमची सत्ता होती त्यावेळी मी तुमच्यासोबत होतो. निवडणुकांपूर्वी लोक मला म्हणत होते, काँग्रेसमध्ये या. पण, मी हवेचा रोख वळगून मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता, आम्ही निवडणुका जिंकलो आहोत. लोकांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिले. मात्र, आपण सर्वांनी एकत्र येऊन विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू. यापुढेही आमचेच सरकार येईल, आम्ही चांगली कामे करू''... असे आठवलेंनी म्हटले. तसेच, लोकसभा अध्यक्षांना उद्देशून बोलताना, आपण जास्त हसत नाहीत. पण, मी तुम्हाला हसवेन असे आठवले यांनी म्हटले. आठवलेंच्या भाषणावेळी सभागृहात एकच हशा पिकला होता.