हॅप्पी इलेक्शन इयर! तीन महिने लोकसभेची धूम राहणार, पाच महिने राज्य विधानसभा निवडणुकांचेही रण तापणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 09:53 AM2024-01-01T09:53:01+5:302024-01-01T10:09:28+5:30
लोकसभा निवडणुकीच्या तराजूत कोण वजनदार...?
ऋषिराज तायडे -
आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी सर्व पक्षांकडून तयारीही सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातील ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ (एनडीए) आणि विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडी यांच्यात थेट लढाई होणार, हे जवळपास निश्चित आहे. भाजपने ५० टक्क्यांहून अधिक मते मिळविण्याचा इरादा व्यक्त केला, तर कॉंग्रसने 'है तैय्यार हम' हा नारा दिला आहे. परंतु सध्याची देशातील राजकीय परिस्थिती पाहता, इंडिया आघाडी भाजपपुढे कितपत आव्हान निर्माण करेल, हा मोठा प्रश्न आहे.
२०२४ या नव्या वर्षांत १८ व्या लोकसभा निवडणुकांचा फड रंगणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हे वर्ष राजकीय धामधुमीचे राहणार आहे.
'एनडीए'चे मिशन ४००+ -
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळविला. यामुळे आगामी लोकसभेसाठी भाजपसह एनडीए आघाडीत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. एनडीए आघाडी ३८ पक्षांची असली, तरी भाजपने २०२४ च्या निवडणुकीसाठी स्वतःच्या ३५० जागा, तर एनडीएसह ४०० जागा व देशभरात ५० टक्क्यांहून अधिक मते मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी भाजपला उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्ये महत्त्वाची आहेत. कारण मागील निवडणुकीत या राज्यांमध्ये भाजपने निम्म्यापेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या. इतर राज्यांमध्ये लक्ष केंद्रित करून आतापासून सभा, कार्यकर्ता मेळावे घेऊन वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. गत निवडणुकीतील आकडेवारी पाहिल्यास, भाजपने ३०३ जागांवर विजय मिळविला होता. त्यात त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ३७.७ टक्के होती. भाजपला ३०३ पैकी २२४ मतदारसंघात ५० टक्क्यांहून अधिक, तर १०१ ठिकाणी ४० टक्क्यांहून अधिक मते मिळाली. आता तर भाजपने ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळविण्यासाठी वेगवेगळ्या व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. त्यानुसार, मागील तीन लोकसभा निवडणुकीत ज्या २०० जागांवर भाजपला विजय मिळविता आला नाही, तेथे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्याशिवाय विरोधी पक्षांमधील बंडखोरांना सोबत घेण्याची रणनीतीही आखली जात आहे.
जमेच्या बाजू... -
- देशात ११ राज्यांत भाजप स्वबळावर, तर ७ राज्यांत मित्रपक्षांसह सत्तेवर आहे. या राज्यांतील एकूण लोकसभेच्या जागांचा विचार केल्यास एकट्या भाजपने २०० जागा जिंकल्या होत्या. मित्रपक्षांसह हा आकडा २५० होतो. त्यामुळे ही राज्ये भाजप व एनडीएसाठी महत्त्वाची आहेत.
- भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रचंड लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार चेहरा हा सर्वांत मोठा यूएसपी आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकाही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करता केवळ मोदींच्या ‘गॅरंटी’वर भाजपने तीन राज्ये जिंकली.
- गृहमंत्री अमित शाह यांच्या रूपात भाजपकडे उत्तम रणनीतीकार आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजपची पक्षसंघटना व प्रचारयंत्रणेवर चांगली पकड आहे. बुथप्रमुख, पन्नाप्रमुख, समन्वयक, कार्यकर्त्यांपासून ते केंद्रीय प्रचार पातळीपर्यंत मोठे नेटवर्क भाजपने उभारले आहे.
- अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी केलेली जय्यत तयारी, त्यानिमित्त देशभरात आयोजित विविध कार्यक्रम, विविध राज्यांमधून लोकांना रामदर्शनाला नेण्याची घोषणा, यातून निवडणुकीच्या वर्षात भाजपसाठी वातावरणनिर्मिती झाली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत विराेधी पक्षांचे पंतप्रधानपदाच्या उमेदवारावर एकमत न हाेणे, भाजपशी स्पर्धा करणारी प्रचारयंत्रणा, व्यूहरचना तसेच ठोस कार्यक्रम विराेधकांकडे नसणे ही भाजपसाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
'इंडिया' देणार का आव्हान?
मागील दहा वर्षांतील पराभवाची मरगळ झटकून निवडणुकीची वातावरणनिर्मिती करण्यासाठी आणि केंद्र सरकारचे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे कसे दुर्लक्ष होत आहे, हे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मागील वर्षी कॉंग्रेसने भारत जोडो यात्रा काढली. त्याचा चांगला परिणाम म्हणून काँग्रेसला कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव करत सत्ता मिळविता आली. शिवाय नुकत्याच झालेल्या तेलंगणाच्या निवडणुकीत काँग्रेसने उत्तम कामगिरी केली. परंतु, लोकसभेवेळी काँग्रेस वा कोणताही विरोधी पक्ष एकट्याने भाजपचा वारू रोखू शकत नसल्याची जाणीव असल्याने २८ मित्रपक्षांनी एकत्र येत इंडिया महाआघाडीची स्थापना केली. मागील लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी एकूण १४० जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी सध्या देशातील ९ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात सत्ता असलेल्या आघाडीने या राज्यांमधून केवळ ८९ जागा जिंकल्या होत्या. एकट्या काँग्रेसचा विचार केल्यास, काँग्रेसने लोकसभेच्या ५४३ पैकी ४२२ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी केवळ ५२ जागांवर विजय, तर २०९ जागी दुसऱ्या क्रमाकांची मते मिळविली होती. इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढविताना, काँग्रेसला उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, दिल्ली-पंजाबमध्ये आप, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा), बिहारमध्ये जेडीयू/राजद, तर अन्य राज्यांतही इतर पक्षांसोबत जागावाटपासाठी तडजोड करावी लागणार आहे.
जमेच्या बाजू... -
- भारत जोडो यात्रेमुळे निर्माण झालेले उत्साहाचे वातावरण अधिक परिणामकारक करण्यासाठी कॉंग्रेसने भारत न्याय यात्रा आखली आहे. ही यात्रा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार असून त्यात अनेक मोठी राज्ये असल्याने काेट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी काँग्रेसकडे आहे.
- दोन-चार प्रादेशिक पक्ष सोडल्यास, इंडिया आघाडीकडे जवळपास २८ विरोधी पक्षांची मोठी फौज आहे. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी मतभेद बाजूला ठेवत लोकांशी निगडीत मुद्द्यांवर एकदिलाने काम केल्यास भाजपपुढे मोठे आव्हान निर्माण करता येऊ शकते.
- तामिळनाडूत द्रमुक, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, दिल्ली-पंजाबमध्ये आम आदमी पार्टी, बिहारमध्ये जेडीयू/राजद पक्षांची एकहाती सत्ता आहे. त्यांच्या स्थानिक व्होटबँकेची ताकद ‘इंडिया’ आघाडीसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
- देशातील धार्मिक ध्रुवीकरणाच्या वातावरणात वाढलेली महागाई, बेरोजगारी, दुष्काळ यासारख्या सामान्य माणसाशी निगडित प्रश्नांचे गांभीर्य मतदारांना पटवून देण्यावर कॉंग्रेससह मित्रपक्ष भर देत आहेत. त्याचा फायदा घेण्यात आघाडी यशस्वी होऊ शकते.
- संसदेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशनात १४३ विरोधी खासदारांचे निलंबन झाले. यामुळे केंद्र सरकार विरोधी पक्षांचा आवाज दाबत असल्याचा संदेश देशभरात पोहोचवून त्याचाही फायदा ‘इंडिया’ आघाडीला घेता येऊ शकतो.
एप्रिल-मे - लोकसभा निवडणूक, त्याच काळात चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका
ऑगस्ट-सप्टेंबर - जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होऊ शकतात.. तसे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत
सप्टेंबर-ऑक्टोबर - महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये विधानसभा निवडणुका नियोजित आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबर - झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित
17 व्या लोकसभा निवडणुकीवेळी देशातील 91.19 कोटींपैकी 61.46 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाचे हे प्रमाण 61.7 टक्के होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी किमान 100 कोटी पात्र मतदार असतील. देशात झालेल्या पहिल्या निवडणुकीवेळी हा आकडा 17.32 कोटी होता.
चिंतनाचे मुद्दे... -
- भाजपच्या तोडीस तोड प्रचार यंत्रणा, पक्षसंघटन, समन्वय एकाही पक्षाकडे नाही. भाजपच्या धोरणाला शह देऊ शकेल, अशी रणनीती इंडिया आघाडीकडे सध्यातरी दिसत नाही.
- ‘इंडिया’तील अनेक पक्षांच्या नेत्यांचा आघाडीला फायदा करून देण्याऐवजी स्वतःला व पक्षाला किती संधी मिळते, यावरच भर राहिला आहे. तसेच अनेक नेत्यांमध्ये एकमेकांबद्दल टोकाचा अविश्वास दिसतो.
- आघाडी स्थापन झाल्याच्या मागील सहा महिन्यांत समन्वयक कोण असेल, नेतृत्व कोण करेल, पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत कमालीचे संदिग्ध वातावरण दिसते.
- नरेंद्र मोदींच्या करिष्म्याचा सामना करू शकेल, अशा देशपातळीवरील लोकप्रिय चेहऱ्याची उणीव ‘इंडिया’ आघाडीकडे आहे. त्यातच पंतप्रधानपदासाठी अनेक नेते दावेदार आहेत.
- प्रादेशिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणारे पक्ष उदा. जेडीयू, जेडीएस ऐनवेळी कोणता डाव टाकतात आणि कोणत्या बाजूने झुकतात, यावरही ‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.
- कॉंग्रेससह देशातील २८ विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया' आघाडीची स्थापना केली. त्यात प्रादेशिक पातळीवर दबदबा असलेले अनेक पक्ष असल्याने ते त्या-त्या राज्यांमध्ये आव्हान निर्माण करू शकतात.
- राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशानंतर कॉंग्रेसने 'भारत न्याय यात्रा' आखली आहे. ही यात्रा महत्त्वाच्या राज्यांमधून जात आहे. तेथील प्रादेशिक पक्षांची साथ कॉंग्रेसला मिळाल्यास भाजपची चिंता वाढू शकते.
- दक्षिण भारतात भाजपला अद्याप जम बसविता आलेला नाही. मागील निवडणुकीत भाजपने या भागात केवळ ३० जागा जिंकल्या हाेत्या. सध्याचे टार्गेट गाठायचे असेल, तर दक्षिण भारताची साथ आवश्यक असेल.
- महाराष्ट्रात महायुतीत शिवसेना (शिंदे गट)पाठोपाठ अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेसही सहभागी झाली. त्यामुळे मित्रपक्षांसोबत लोकसभेचे जागावाटप करताना भाजपला कसरत करावी लागेल.
- महागाई, बेरोजगारी, कुस्तीपटूंची नाराजी, मणिपूर हिंसाचार, संसदेतील घुसखोरी हे मुद्दे विरोधकांनी जोरकसपणे लावून धरल्यास, त्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी भाजपलाही जाेरदार तयारी करावी लागेल.