मुंबई, दि. 15 - संपुर्ण देशभरात आज 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. सर्व भारतीय एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. सर्च इंजिन गुगलनेही भारतीयांना 71 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने डुडलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. गुगल नेहमीच महत्वाचे दिवस, सण असले की डुडलच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतो.
देशभरात आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. यानिमित्ताने गुगलनं हे डुडल तयार केलं आहे. गुगलच्या या डुडलमध्ये भारताचं संसद भवन तिरंगी रंगात दाखवण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लाल किल्ल्यावरुन सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन सलग चौथ्यांदा देशवासियांनी संबोधित केले. देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी देशवासियांना कोटी-कोटी शुभेच्छा. संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचाही उत्सव साजरा करत आहे. सुदर्शन चक्राधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वाकोटी देशवासियांतर्फे नमन करतो, असेही उद्गार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले.
विकासाच्या शर्यतीत आपण सर्व एकत्रितरित्या पुढे जाण्यासाठी काम करुया. जीएसटीमुळे देशाची कार्यक्षमता 30 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डिजिटल देवाण-घेवाणीत 34 टक्के वाढ झाली आहे. जीएसटीमुळे वेळेसोबतच हजारो कोटीही वाचले आहेत. देशाला ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र असे करत असताना गती कमी होऊ देणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. हा देश बुद्धांचा आहे, गांधीचा आहे, येथे आस्थेच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कट्टरतावाद्यांना खडसावले आहे.
सरकारमध्ये डाळ खरेदी करण्याची प्रथा कधीच नव्हती,यावर्षी 16 लाख टन डाळ खरेदी केली. सरकारनं शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आणि 16 लाख टन डाळ खरेदी करुन इतिहास रचला असंही मोदींनी सांगितलं आहे.