नवी दिल्ली - सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2019 चे स्वागत करण्यात आले आहे. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतषबाजी करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'नववर्षात सर्वांना सुख-समृद्धी, सदृढ आरोग्य लाभो', अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन दिल्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील नवीन वर्षाच्या देशवासियांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ''सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! वर्ष 2019 देशवासियांना व संपूर्ण जगातील समुदायांच्या जीवनात सुख-समृद्धी, शांती व आनंद लाभत राहो''.असे ट्विट करत राष्ट्रपती कोविंद यांनी देशवासियांनी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह अनेक दिग्गजांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळला. टोंगा आयलँडने सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत केले. न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यात आले. न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, कोरिआ,जपान, चीन, दुबई, रशिया, ग्रीस, फ्रान्स या देशांसह जगभरात नव्या वर्षाचे आगमन झाले. टि्वटरवरून #हॅप्पी न्यू ईअर २०१९, #न्यू ईअर, #गुडबाय २०१८, # वेलकम २०१९ असे हॅशटॅग वापरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.