श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनेनववर्षाची सुरुवात खणखणीत कामगिरीने केली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील तळावरून इस्रोने एक्स्पोसॅट हा उपग्रह सोमवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी प्रक्षेपित केला. एक्स्पोसॅट ही एक प्रकारची दुर्बीण असून तिच्या माध्यमातून अवकाशातील कृष्णविवरांच्या अंतरंगाचे संशोधन केले जाईल. या खगोलीय घटकांवर संशोधन करणारा अमेरिकेनंतर भारत हा जगातील दुसरा देश ठरला आहे.
गतवर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाश यान उतरविणारा भारत हा पहिला देश ठरला होता. त्यानंतर आता एक्स्पोसॅट नावाचा उपग्रह प्रक्षेपित करून भारताने अवकाश संशोधनात आणखी एक पाऊल टाकले आहे.
भारतासाठी संशोधनाचे नवे दालन उघडले -एक्स्पोसॅट उपग्रह अवकाशातील तीव्र क्ष-किरण स्रोतांच्या ध्रुवीकरणाची तपासणी करणार आहे. अशा अभ्यासासाठी इस्रोने तयार केलेल्या पहिलावहिल्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताला संशोधनाचे नवे दालन खुले झाले.
याआधी अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने डिसेंबर २०२१मध्ये असा अभ्यास केला होता. सुपरनोव्हा स्फोटांच्या अवशेषांवर तसेच कृष्णविवर तसेच अन्य वैश्विक घटनांद्वारे उत्सर्जित कण प्रवाहांवर अमेरिकेने संशोधन केले होते.
एक्स्पोसॅटवर पोलारीमीटर इन्स्ट्रुमेंट इन एक्स-रेज (पाॅलिक्स) व एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी अँड टाइमिंग (एक्सस्पेक्ट) ही दोन उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्यांच्या मदतीने कृष्णविवरांतील अंतरंग तसेच न्यूट्रॉन ताऱ्यांवर संशोधन केले जाणार आहे