लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवली असून मागील तीन निवडणुकांत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. ही माहिती स्वत: खा. पवार यांनीच पत्रकारांना दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राष्टÑवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून प्राप्तिकर विभाग नोटीस पाठवणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, सुप्रियाला अद्याप नोटीस मिळालेली नाही. मला मात्र काल नोटीस आली आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकांत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांबाबत ही नोटीस आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून मला ही नोटीस आली. त्याचे उत्तर लवकरच मी देईन. देशातील इतक्या सदस्यांपैकी आमच्याबद्दलच ‘प्रेमाची भावना’ यातून दिसत आहे. त्याबद्दल आनंद आहे, असा टोला शरद पवार यांनी या वेळी लगावला.दिवसभर अन्नत्याग!राज्यसभेत कृषी विधेयकांवरील चर्चेदरम्यान गोंधळ घातल्याने निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांनी अन्नत्याग केला आहे. त्यांना समर्थन म्हणून आपणदेखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. राज्यसभा उपासभापतींनी नियमांना महत्त्व न देता, सदस्यांचे अधिकार नाकारले आणि आज त्यांनीच उपोषण करणाऱ्या सदस्यांना चहा देण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरंच झालं, असा टोमणाही त्यांनी मारला.