हापुड-
उत्तर प्रदेशच्या हापुडमधील मुक्तेश्वरा महादेव मंदिराच्या जमिनीवर अवैध पद्धतीनं अधिग्रहण केल्याप्रकरणी योगी प्रशासनाकडून बुलडोजर चालवण्यात आला आहे. नक्का कुआं रोडवर स्थित मुक्तेश्वरा महादेव मंदिराच्या जमिनीवर काही लोक गेल्या ५० वर्षांपासून अवैधरित्या राहात होते. प्रशासनाच्यावतीनं आज या परिसरात अवैध घरं आणि दुकानांवर कारवाई करण्यात आली.
एसडीएमनं याआधी मंदिराच्या जमिनीवरल अवैधरित्या घर आणि दुकानं बांधलेल्यांना जागा मोकळी करण्यासाठीची नोटीस दिली होती. त्यानंतर आज बुलडोजरनं कारवाई करण्यात आली. यामुळे २० कुटुंब आज रस्त्यावर आली आहेत. संबंधित जमिनीवरील घरं जमिनदोस्त करण्यात आली आहेत.
इतक्या वर्षांपासून आपण राहत असलेल्या घरावर बुलडोजर चालवता जात असल्याचं उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्यांचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. एका बाजूला बुलडोजरनं कारवाई सुरू होती. तर दुसरीकडे वयोवृद्ध महिला, मुली आणि लहान मुलं धायमोकलून रडत होती. रहिवासी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर कारवाई न करण्यासाठी गाऱ्हाणं मांडत होते. कुटुंबाच्या कुटुंब रस्त्यावर आल्यानं सारं रडत आहेत.
पीडीत कुटुंबातील एका तरुणीनं आपल्या भावना मीडियासमोर व्यक्त केल्या. "आम्ही मतदान तर योगींनाच केलं होतं. पण त्यांनीच आमचं राहतं घर तोडलं आणि आम्हाला रस्त्यावर आणलं. आमचं २० जणांचा कुटुंब आहे. सर्वांनी भाजपालाच मतदान केलं होतं. आम्ही जवळपास १०० वर्षांहून अधिक काळापासून येथे राहात होतो", असं ती म्हणाली.
"मुक्तेश्वरा महादेव मंदिर महाभारतकालीन प्राचीन मंदिर आहे. या परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. याआधी संबंधितांना नोटीस देण्यात आली होती. काही लोकांनी नोटीसचं पालन करत घर खाली देखील केली. पण ज्यांनी जागा खाली केली नाही त्यांच्यावर आज कायदेशीररित्या कारवाई करण्यात आली आहे", असं गढमुक्तेश्वरचे एसडीएम अरविंद द्विवेदी यांनी सांगितलं.