नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी इयत्तेच्या पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, देशात माहिती, आधार, SSC Exam, निवडणुकीची तारीख, CBSE चे पेपर्स अशी प्रत्येक गोष्ट लीक होत आहे. देशाचा चौकीदार कमकुवत (वीक) झाल्याने हे सगळे प्रकार घडत आहेत, असे राहुल यांनी म्हटले आहे. CBSE बोर्डाचा दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याची बाब समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.शेवटी या दोन्ही विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय बोर्डाला घ्यावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आता संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
तत्पूर्वी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनीही भाजपा सरकारला लक्ष्य केले. सीबीएसईचे पेपर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फुटतायत. त्यामुळे भारतात होणा-या परीक्षा तरी गैरप्रकारांपासून सुरक्षित आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे नमो अॅपद्वारे आपली खासगी माहिती अमेरिकेत पोहोचत आहे, तरीही मोदी सरकारकडून आधारची माहिती सुरक्षित असल्याचा दावा करणं हे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.