नवी दिल्ली/मुंबई - हर घर तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी सरकारने २० कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान जन भारत सोबत हे लक्ष्य साध्य करण्यास सुरुवातही झाली आहे. त्यानिमित्ताने घरोघरी तिरंगा फडकला असून अनेक गावात, शहरात आणि महानगरांमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजनही करण्यात आले आहे. मात्र, या मोहिमेसाठी खरेदी केलेल्या झेंड्यांवरुन टिका होत आहे. त्यातच, आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून तिरंगा ध्वजाची रक्कम म्हणून 38 रुपये पगारीतून कपात करण्यात येणार आहेत. त्यामुळे, हे अभियान चर्चेचे आणि वादाचा मुद्दा बनले आहे.
सरकारच्या या अभियान आणि देशाच्या स्वातंत्र्यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्ताने आज प्रत्येक घरात तिरंगा मोहीम राबवली जात आहे, पण, एक काळ असा होता की प्रत्येक घरावर तिरंगा फडकवता येत नव्हता, असे अनेक बदल घडले, ज्यानंतर सामान्य माणूस घर, कार्यालय, शाळांमध्ये तिरंगा फडकवू शकत आहे. त्यासाठी, मोठ्या प्रमाणा तिरंगा ध्वज बनविण्यात आले असून ते विकतही घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून या ध्वजासाठी 21 ते 38 रुपये कपात होणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पगारातून ही रक्कम कपात होईल. यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने पत्रही जारी केले आहेत. मात्र, रेल्वे कर्मचारी युनियनने या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे.
युनियनचे नेते चंदन सिंह यांनी सरकारने हा निर्णय आमच्यावर थोपवू नये. रेल्वे कर्मचारी राष्ट्रभक्त आहेत, ते स्वत: तिरंगा ध्वज घेऊन येतील, असे म्हटले आहे.
देशात चैतन्यमय वातावरण
‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत विविध राज्यांमध्ये तिरंगा हाती घेऊन शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मिरवणुका काढल्या. विविध पक्षांचे राजकीय नेते, मंत्री, सरकारी अधिकारी, सर्वसामान्य जनांच्या घरांवर तिरंगा डौलाने फडकत आहे. ठिकठिकाणच्या बाजारांमध्ये नागरिक तिरंगी कपडे खरेदी करताना दिसत आहेत. मोठ्या रहिवासी सोसायट्यांनीही तिरंगी रोषणाई करून या उत्साहात भर घातली आहे. अनेक विक्रेत्यांनही तीन रंगांची मिठाई तयार करण्यावर भर दिला आले. विविध चॅनेल्सवरही देशभक्तीपर गीते आणि सिनेमे दाखविले जात आहेत. एकूणच ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे साऱ्या देशात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. देशभरातील लोकांनी तिरंगा ध्वजासोबतची आपली छायाचित्रे harghartiranga.com या वेबसाइटवर शेअर करावीत. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
तिरंगा हा साऱ्या भारताचा अभिमान आहे. स्वातंत्र्यलढ्यामध्ये असंख्य देशभक्तांनी बलिदान दिले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे आपला देश स्वतंत्र झाला. ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेद्वारे या स्वातंत्र्यसैनिकांना सर्व भारतीयांनी आदरांजली अर्पण केली आहे.- अमित शहा, गृहमंत्री