प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे आजपासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. त्रिशूळ, गदा, तलवारी नाचवत व डमरू वाजवत कुंभमेळ्यातील मकर संक्रांतीच्या पहिल्या शाही स्नानासाठी संत महंतांच्या शोभा यात्रांना प्रारंभ झाला. कडाक्याच्या थंडीत धार्मिक आस्थेची उब उरी बाळगणारे लाखो भक्त पवित्र स्नानासाठी त्रिवेणी संगमावर पोहोचले आहेत. त्यातच, केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनीही गंगा स्नान केले. गंगा नदीत डुबकी घेऊन इराणी यांनीही शाही स्नान केले.
आखाडा परिषदेच्या शिरस्त्याप्रमाणे व परंपरेनुसार पहाटे 5.15 वाजता महानिर्वाणी व अटल आखाड्याने संगमाकडे प्रस्थान ठेवले तर 5.45 वाजता निरंजनी व आनंद आखाड्याची शोभायात्रा प्रारंभ झाली आहे. महानिर्वाणीचे आचार्य विश्वत्मानंद सरस्वती, स्वामी वासुदेवानंद सरस्वती आदी महामंडलेश्वर रथावर आहेत. तर, महंतांसह, अनेक दिग्गज आणि भाविक भक्तही गंगा स्नानाचा लाभ घेत आहेत. केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनीही प्रयागराज येथे जाऊन पवित्र गंगास्नानाचा लाभ घेतला. स्मृती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन गंगा स्नानाचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच, हर हर गंगे.. असेही त्यांनी लिहिले आहे.
निरंजनीचे महंत नरेंद्र गिरी, आनंद पिठाधिश्वर स्वामी बालकानंद गिरी व त्यांच्या पाठीमागे सोमेश्वरानंद गिरी, परमानंद गिरी, कालच महामंडलेश्वर म्हणून पट्टाभिषेक झालेल्या केंद्रीय राज्यमंत्री निरंजना ज्योती, विष्णुचैतन्य गिरी, गुरू माँ आनंदमयी, विद्यानंद गिरी, महेशानंद गिरी, सत्यानंद गिरी आदींचे फुलांनी सुसजजीत रथ आहेत. आखड्यांच्या इष्ट देवतांच्या पालख्या व धर्मध्वज अग्रभागी आहेत. गा, यमुना व सरस्वतीच्या संगमावर कुंभ स्नान होत असून स्नानास जाणाऱ्या संत महंतांचं दर्शन व आशिर्वादासाठी रस्त्याच्या दुतर्फा भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. कुंभासाठी सोडलेल्या खास रेल्वे, एसटी व खासगी वाहनांद्वारे लाखो भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. संगमाकडे जाणाऱ्या सर्वच मार्गांवर कालपासूनच वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येऊन वाहनं शहराबाहेर रोखली गेल्याने भाविकांना सुमारे 10 ते 12 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून संगम तटावर सुरक्षा रक्षक तैनात आहेत. ड्रोन कमेऱ्याद्वारे शाही मिरवणूक मार्गावर नजर ठेवली जात आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत विविध आखड्यांचं शाही स्नान चालणार आहे. शैव पंथीयांचे 10 तर वैष्णवांचे 3 असे एकूण 13 आखाडे व त्यांच्या अंतर्गत असलेले खालसे यात सहभागी झाले आहेत.